हडपसरपर्यंत "एलिव्हेटेड' रेल्वेमार्ग 

मंगेश कोळपकर 
Tuesday, 25 February 2020

पुणे स्टेशनवरील लोहमार्गाच्या बाजूने हडपसर रेल्वे स्थानकापर्यंत 11 किलोमीटरचा "एलिव्हेटेड' रेल्वे ट्रॅक' उभारण्याच्या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली. त्यामुळे देशात पहिल्यांदाच लोहमार्गाच्या बाजूने एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅक पुण्यात साकारणार आहे.

पुणे - पुणे स्टेशनवरील लोहमार्गाच्या बाजूने हडपसर रेल्वे स्थानकापर्यंत 11 किलोमीटरचा "एलिव्हेटेड' रेल्वे ट्रॅक' उभारण्याच्या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली. त्यामुळे देशात पहिल्यांदाच लोहमार्गाच्या बाजूने एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅक पुण्यात साकारणार आहे; तसेच रेल्वे मालधक्‍क्‍याच्या बाजूलाही 7 एकर जागेत नवे 
एलिव्हेटेड रेल्वे स्थानक उभारले जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅक साकारण्याचा प्रकल्प आराखडा तयार झाला आहे. आता त्याला राज्य सरकारची परवानगी अपेक्षित आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते. 11 किलोमीटर लांबीचा ट्रॅक उभारण्यासाठी सध्याच्या रेल्वे ट्रॅकशेजारील सुमारे पाच ते सहा फूट जागेचा वापर होऊ शकतो. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी झाली आहे. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या आराखड्याला मध्य रेल्वेने नुकतीच मंजुरी दिली. त्याअंतर्गत हे काम होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनची क्षमता संपली असल्यामुळे मालधक्‍क्‍याजवळ रेल्वेची सुमारे सात एकर जागा आहे. त्यात स्वतंत्र स्थानक होणार आहे. 

रेल्वेमार्ग एलिव्हेटेड असल्यामुळे रेल्वेचे स्थानकही एलिव्हेटेड होईल. सुमारे सात मजली इमारतीमध्ये तळमजल्यावर पार्किंगची सुविधा असेल. पहिल्या मजल्यावर स्थानक असेल. या स्थानकातून एलिव्हेटेड रेल्वे मार्ग निघणार आहे. दरम्यानच्या काळात हडसर रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे एलिव्हेटेड मार्ग तेथपर्यंत असेल. तेथून पुढे नाशिकपर्यंत लोहमार्ग हा जमिनीला समांतर असेल. पुणे स्थानक ते हडपसर दरम्यान जागेची टंचाई आहे; तसेच भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो; तसेच त्याचा खर्चही मोठा असेल. त्यामुळे एलिव्हेटेड रेल्वेमार्गाचा पर्याय निवडण्यात आला आहे. 

मालधक्‍क्‍याजवळ होणाऱ्या नव्या स्थानकातून प्रवाशांना पुण्यातील मेट्रोमध्येही जाता येईल. त्यासाठी नवे स्थानक, रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानक यादरम्यान "वॉक वे' उभारण्यात येणार असल्याने रेल्वेचे प्रवासी मेट्रोत आणि मेट्रोही थेट रेल्वे स्थानकात येणार असल्यामुळे प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहे. 

"एमआरआयडी'ची स्थापना 
पुणे-नाशिक रेल्वेमार्ग करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरआयडी) ही कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून या प्रकल्पाचे कामकाज होईल. त्यासाठी "मोनार्क'मार्फत प्रकल्प आराखडा तयार केला आहे. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने त्याला मंजुरी दिल्यावर या प्रकल्पाचे काम सुरू होईल. 

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. त्या अंतर्गतच तयार करण्यात आलेल्या आराखड्याला रेल्वेची मंजुरी मिळालेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. 
- राजेश जैस्वाल, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elevated railroad