बेसुमार बांधकामांमुळे अकरा गावांत सुविधांची होणार बोंब!

ब्रिजमोहन पाटील
रविवार, 25 ऑगस्ट 2019

शहराच्या हद्दीलगतच्या गावांमध्ये अनिर्बंध बांधकामे होत असल्याने राज्य सरकारने 4 ऑक्‍टोबर 2017 रोजी उरळी देवाची, फुरसुंगी, लोहगाव, शिवणे, उत्तमनगर, मुंढवा, साडेसतरानळी, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक ही 11 गावे महापालिकेत समाविष्ट केली.

पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्यासाठी सध्याच्या जमीन वापराचे (ईएलयू) नकाशे तयार करण्यात येत आहेत. ही गावे महापालिकेत येण्यापूर्वी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिलेल्या बांधकाम परवानग्या आणि बेकायदा बांधकामे यामुळे नागरिकांना सुविधांसाठी पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याचे यातून समोर आले आहे. यामुळे या गावांचा विकास आराखडा (डीपी) केला जात असला, तरी सुविधांची बोंब होण्याची शक्‍यता आहे. 

शहराच्या हद्दीलगतच्या गावांमध्ये अनिर्बंध बांधकामे होत असल्याने राज्य सरकारने 4 ऑक्‍टोबर 2017 रोजी उरळी देवाची, फुरसुंगी, लोहगाव, शिवणे, उत्तमनगर, मुंढवा, साडेसतरानळी, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक ही 11 गावे महापालिकेत समाविष्ट केली. या गावांमध्ये सध्या शाळा, रुग्णालये, मोकळ्या जागा, सरकारी जागा, निवासी भाग, व्यावसायिक भाग, रस्ते, उद्याने, अस्तित्वातील नाले यांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यानंतर सॅटेलाइट, जीएसआयचा वापर करून नकाशे केले जात आहेत. त्यानुसार सहा गावांचे मॅपिंग झालेले आहे. 

महापालिकेत ही गावे समाविष्ट होण्यापूर्वी "पीएमआरडीए'ने अनेक बांधकामांना परवानग्या दिल्या. त्या देताना नागरी सुविधांसाठी जागाही सोडल्या नाहीत. त्याचप्रमाणे अवैध बांधकामेही मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे रस्ते, सांडपाणीवाहिन्यांसह इतर सुविधांसाठीही जागा शिल्लक नाही. अनेक भागांत चिंचोळे रस्ते आहेत. हा सर्व भाग दाट लोकवस्तीचा असल्याने "ईएलयू' नकाशे तयार करणे अवघड बनले आहे. यासाठी किमान पाच ते सहा महिने लागू शकतात. यामुळे प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात अनेक अडचणी येणार असल्याचे महपालिकेतील सूत्रांनी सांगितले. 

अकरा गावांचा विकास आराखडा करण्याचे काम सुरू आहे. "ईएलयू' नकाशे तयार करण्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल. याचा तपशील जाहीर करता येत नाही. परंतु नागरिकांना चांगल्या सुविधा या विकास आराखड्यातून मिळतील. 
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, महापालिका 

शहराचे क्षेत्रफळ 
जुने - 252 चौरस किलोमीटर 
गावांच्या समावेशानंतर - 333 चौरस किलोमीटर 

अकरा गावांचे क्षेत्रफळ - 81 चौरस किलोमीटर 
लोकसंख्या - सुमारे 3.75 लाख 
मिळकतींची संख्या - सुमारे1.24 लाख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven villages are into problem due to countless construction works