अकरावीच्या प्रवेश क्षमतेत पाच टक्‍क्‍यांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावीच्या प्रवेश क्षमतेत पाच टक्‍क्‍यांनी वाढ

अकरावीच्या प्रवेश क्षमतेत पाच टक्‍क्‍यांनी वाढ

पुणे - अकरावीच्या प्रवेश क्षमतेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास पाच टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एकूण 285 महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, विज्ञान आणि एच.एस.व्ही.सी. या शाखांमधील सुमारे 96 हजार 320 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे.

गेल्या वर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी 91 हजार 670 जागा होत्या. शैक्षणिक वर्ष 2017-18 च्या तुलनेत यंदा कला शाखेत एक हजार 30, वाणिज्य शाखेत एक हजार 905, विज्ञान शाखेत एक हजार 810 जागांनी वाढ झाली आहे. तर एच.एस.व्ही.सी.च्या जागा गेल्या वर्षीच्या तुलनेत 95ने कमी झाल्या आहेत. यंदा प्रवेशासाठी सुमारे चार हजार 650 जागांची वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशाच्या जागांमध्ये 5.7 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी दिली.

यंदा विज्ञान शाखेत सर्वाधिक अशा 39 हजार 90 जागा असून त्याखालोखाल वाणिज्य शाखेत 38 हजार 660 जागा उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्जातील भाग एक आणि भाग दोन भरता येत आहेत. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत 77 हजार 822 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

त्यातील 39 हजार 828 विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे; तर 23 हजार 582 विद्यार्थ्यांनी भाग दोन म्हणजे गुण आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरेल आहेत. द्विलक्ष्यी (बायोफोकल) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी एक हजार 406 विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले आहेत.

एम.सी.व्ही.सी. प्रवेशासाठी एकूण चार हजार 570 जागा उपलब्ध असून त्यामध्ये मराठी माध्यमासाठी तीन हजार 40, तर इंग्रजी माध्यमासाठी एक हजार 530 जागा आहेत. अकरावी प्रवेशाला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांची आणि जागांची माहिती घेऊन अर्ज भरावेत. प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती www.dydepune.com आणि http://pune.11thadmission.net या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे.

अकरावी प्रवेश क्षमता -
शाखा : शैक्षणिक वर्ष 2018-19 : शैक्षणिक वर्ष 2017-18
कला शाखा : 14,000 : 12,970
वाणिज्य शाखा : 38,660 : 36,755
विज्ञान शाखा : 39,090 : 37,280
एच.एस.व्ही.सी : 4,570 : 4,665
एकूण : 96,320 : 91,670