
एल्गार प्रकरण : आरोपींच्या उपकरणांमध्ये पोलिस व तपास यंत्रणांनी स्पायवेअर व मालवेअर पाठवून पुरावे पेरले
पुणे : "एल्गार परिषदे'प्रकरणी अटक केलेल्या मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांच्या लॅपटॉप, कॉम्पुटरमधील माहितीमध्ये पोलिस व तपास यंत्रणेकडून फेरफार व हेरगिरी करण्याची संगणक प्रणाली वापरुन (स्पायवेअर/मालवेअर) थेट पुरावे पेरल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याच पुराव्यांच्या आधारे संबंधित कार्यकर्त्यांवर विविध प्रकारच्या गंभीर आरोपांखाली अटक केल्याचा दावा सायबर सुरक्षेसंदर्भात काम करणाऱ्या अमेरीकेतील सेंन्टीनेल संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे.
मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्या रोना विल्सन, वरवरा राव, प्रा.हॅनी बाबू यांच्यासह 16 जणांवर पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध ठेवणे, भीमा कोरेगाव दंगलीचा कट रचण्यापासून ते थेट पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचण्यापर्यंतचे गंभीर आरोप करीत त्यांना अटक केली होती. मागील चार वर्षांपासून बहुतांशजण कारागृहात असून अद्याप त्यांची सुटका झालेली नाही. दरम्यान, या प्रकरणावर अमेरीकेतील सायबर सुरक्षेबाबत काम करणाऱ्या सेंन्टीनेल या संस्थेच्या संशोधकांनी काम करुन खास अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालामधून धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या व सध्या राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) असलेल्या "एल्गार' प्रकरणासंदर्भातील आरोपींबाबत सेंटीनेल संस्थेने महत्वपुर्ण माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अटक केलेल्या मानवी हक्क चळवळीतील रोना विल्सन, वरवरा राव, प्रा.हनी बाबू यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या लॅपटॉप, कॉम्पुटर यांसारख्य महत्वाच्या उपकरणांमध्ये पोलिस व तपास यंत्रणेने स्पायवेअर व मालवेअरद्वारे पुरावे पेरले. ""तुम्ही ज्यांच्या विरोधात बोलत आहात, ते तुम्हाला अडकवण्यासाठी तुमच्या विरुद्ध अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आहेत' असे संबंधित अहवालात नमूद केले आहे.
आरोपींना विविध स्पॅम ईमेल पाठवून त्यांच्या उपकरणांचा ताबा घेण्यात आला. त्यानंतर त्यांच्या उपकरणांमधील माहितीची छेडछाड करण्यात आली. "मॉडिफाईड एलिमेंट' या स्पायवेअरचा वापर करुन संबंधित सायबर हल्ले करण्यात आले. पॅगासिस या संगणक प्रणालीचा वापर करुनही यापुर्वी संबंधित कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान, ""सेन्टीनेल संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने या प्रकरणात मागील चार वर्षांपासून कारागृहात असलेल्या मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांना न्याय द्यावा'' अशी मागणी कबीर कला मंचच्या सदस्यांनी केली आहे.
सेंन्टीनेल संस्थेच्या अहवालातील महत्वाच्या नोंदी
"मॉडिफाईड एलिमेंट' हे सिक्युरिटी थ्रेट वापरुन मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्यांच्या विरोधात कारवाया.
जीमेल, याहु यांचा वापर करुन "मॉडिफाईड एलिमेंट' काम करते
आरोपींना काही ईमेल पाठविण्यात आले
मुंबई उच्च न्यायालयाचे एससी व एसटी विद्यार्थ्यांच्या बाजुचा निकाल, अशा स्वरुपाच्या ईमेल/अटॅचमेंटचा समावेश
संबंधित ईमेलवरील अटॅचमेंट उघडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उपरणांमधील डेटा वाचता, बदलता येणे शक्य होते
त्यातील महत्वाचा पुरावा असणारी पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भातील एक फाईल हि फॉरेन्सिक अहवालात "मॉडिफाईड एलिफंट'च्या माध्यमातून पाठविल्याचे स्पष्ट झाले
अनेकदा "फिशींग' ईमेल पाठवून स्पायवेअर टाकण्याचे झाले प्रयत्न
तज्ज्ञ असल्याशिवाय असे स्पायवेअरचा वापर करणे शक्य नसल्याचे सेंन्टिनेलचा दावा
Web Title: Elgar Council Human Rights Movement Spyware And Malware Information About Evidence Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..