खडकी परिसरात  पदपथांवर अतिक्रमणे 

-रूपाली अवचरे  ------------------- 
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पुणे ः खडकी परिसरात अनेक ठिकाणी व्यावसायिक आपल्या दुकानासमोर, तसेच पदपथावर विक्रीचे साहित्य ठेवतात. अनेक वेळा दुचाकी पदपथावरच उभ्या केल्या जातात, तर काही वेळा मोकाट जनावरेसुद्धा या पदपथावर ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना कसरत करावी लागते. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालून अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. 

दुकानदार आपल्या मालाची जाहिरात व्हावी, ग्राहक आकर्षित व्हावा, आपल्या दुकानात कोणते साहित्य विक्रीला ठेवले आहे, याची ग्राहकांना माहिती व्हावी, या उद्देशाने ते दुकानातील काही माल जागा असल्यास दुकानाच्या समोर नाहीतर चक्क पदपथांवर ठेवतात. 
त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तरी साहित्य बाहेर ठेवले नाही तर ग्राहक आकर्षित होत नाही, अशा मानसिकतेतून दुकानदार पुन्हा पदपथावर माल ठेवतात, परंतु आपल्या या कृतीमुळे पादचाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागते याचे त्यांना त्याचे काहीएक देणेघेणे नसते. 
मोकाट जनावरेसुद्धा पदपथ व्यापून टाकतात. त्यांचीही वेळोवेळी कोंडवाड्यात रवानगी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुकानात येणारे ग्राहकही अनेक वेळा दुकानासमोरील पदपथावर गाड्या उभ्या करून खरेदीस जातात. सर्व पदपथ व्यापल्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरुन चालण्याशिवाय पर्याय राहत नाही. 

""पदपथावर असलेल्या वस्तूंमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांना पदपथावरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. नाइलाजास्तव त्यांना रस्त्यावरून चालावे लागते. रस्त्यावरून भरधाव वाहने जात असल्याने त्यांचा धक्का लागून अपघात होण्याची शक्‍यता निर्माण होते. तरी प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून याविरोधात नियमित कारवाई करावी.'' -अनुराग दुबळे, स्थानिक रहिवासी 

""पदपथावर साहित्य ठेवण्याची व्यावसायिकांची मानसिकता प्रथम बदलली पाहिजे. या परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई सतत होत राहते. आम्ही तो माल जप्त करतो, परंतु दंड भरल्यानंतर तो परत करावा लागतो.'' -रवींद्र वैकर, प्रशासकीय अधिकारी, कॅंटोन्मेंट बोर्ड 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment on foothpath in Kadhki