esakal | रस्ते, पदपथ व सार्वजनिक ठिकाणांचा राजकीय कार्यकर्त्यांकडून अतिक्रमण 

बोलून बातमी शोधा

Encroachment of roads sidewalks and public places by political activists}

गल्ली बोळातील नव्हे तर मुख्य रस्त्यावरही अतिक्रमणे बोकाळली आहेत. रस्ते वाहतूकीसाठी खुले करण्यासाठी अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर राज्यकर्ते अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पदपथ केव्हाच गिळंकृत केले आहेत.

pune
रस्ते, पदपथ व सार्वजनिक ठिकाणांचा राजकीय कार्यकर्त्यांकडून अतिक्रमण 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे कॅन्टोन्मेंट : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दाट लोकवस्तीमध्ये असलेल्या गल्ली-बोळातील रस्त्यावर आणि पदपथावर राज्यकर्त्यांनीच वाचनालये उभारली आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूला भंगाराच्या दुकानांनी उच्छाद मांडली आहे. सामान्य नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. सर्व पक्षीय राज्यकर्ते आणि संघटनांमुळे अतिक्रमण विभागाला कारवाई करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गल्ली बोळातील नव्हे तर मुख्य रस्त्यावरही अतिक्रमणे बोकाळली आहेत. रस्ते वाहतूकीसाठी खुले करण्यासाठी अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर राज्यकर्ते अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पदपथ केव्हाच गिळंकृत केले आहेत. आता अर्ध्याहून अधिक रस्त्यावर अतिक्रमणे थाटली आहेत. त्यात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वाहनचालकांना डोळ्यात तेल घालून वाहने हाकावी लागतात, तर पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत असल्याचे भयानक चित्र भवानी पेठेमध्ये पाहायला मिळत आहे. सार्वजनिक नळकोंडाळ्यावर बांधकामे केली आहेत. त्यामुळे भविष्यात रस्त्यावरही बांधकामे केली जातील. फार तर तळमजला वाहतुकीसाठी रस्ता केला जाईल आणि हवे तसे बांधकाम करून घेतले जाईल, त्याला राजकारणीच प्रोत्साहन देतील. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे एखादी दुर्घटना घडली तर येथील नागरिकांना मदत मिळणार नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे. या बाबीचा तरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी विचार करून रस्त्यावरील अतिक्रमणांना पाठीशी घालता ती काढण्यासाठी मदत करावी, असा सबुरीचा सल्ला भवानी पेठेतील नागरिकांनी दिला आहे.

रस्ते वाहतुकीसाठी आहेत, दुकाने आणि कार्यालये थाटण्यासाठी नाहीत, हे सर्वश्रूत आहे. मात्र, भवानी पेठेतील अंतर्गत रस्त्यावर राजकीय नेत्यांनी वाचनालये बांधली आहेत. तसेच एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचे कार्यालय आहे. त्यामुळे इतरही कार्यकर्त्यांनी अतिक्रमण करीत स्वतःची दुकाने थाटली आहेत. काहींनी हातगाड्या आणि जुनी वाहने उभी करून जागेवर ताबा मिळविला आहे. त्यामुळे कारवाई करताना अनेकांशी सामना करावा लागत असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

गलिच्छ वस्ती निर्मूलनच्या (गवनि) वतीने अतिक्रमणावर कारवाई करणे अपेक्षित आहे. अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्याची मोहीम सुरू केली, तर सर्व पक्षीय आणि संघटनांचे पदाधिकारी दबाव आणतात. गल्लीबोळातील रस्त्यावर खच्चून गर्दी असल्यामुळे कारवाई पथक पोहोचेपर्यंत अतिक्रमणधारक पळून जातात. त्यामुळे कारवाई करता येत नाही, अशी अवस्था आहे.
- राजेश खुडे, अतिक्रमण विभागप्रमुख- भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय