Vidhan Sabha 2019 : पाऊस व कोंडीतच प्रचाराची सांगता 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 October 2019

पुणे : मुसळधार पाऊस व वाहतूक कोंडीतच शनिवारी पुण्यातील प्रचाराची सांगता झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून लढत असल्याने सत्ताधाऱ्यांनी पुण्याकडे सर्वाधिक लक्ष घातले. तर, पाटील यांना हरविण्यासाठी दोन्ही काँग्रेसने ऐनवेळी मनसेला पाठिंबा दिल्याने पुण्यातील निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. 

पुणे : मुसळधार पाऊस व वाहतूक कोंडीतच शनिवारी पुण्यातील प्रचाराची सांगता झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून लढत असल्याने सत्ताधाऱ्यांनी पुण्याकडे सर्वाधिक लक्ष घातले. तर, पाटील यांना हरविण्यासाठी दोन्ही काँग्रेसने ऐनवेळी मनसेला पाठिंबा दिल्याने पुण्यातील निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत महायुती आणि आघाडीत लढत होत आहे. त्यातील काही मतदारसंघांत मनसेच्या शिलेदारांचे आव्हान आहे. वंचित बहुजन आघाडी, 'एमआयएम', 'आप' या पक्षांच्या उमेदवारांमुळे ही लढत रंगतदार झाली आहे. परंतु, आपल्या जागा राखतानाच जिल्ह्यातील काही मतदारसंघ खेचण्याच्या उद्देशाने महायुतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, खासदार सनी देओल यांना प्रचारात उतरविले होते. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य राज्यांतील भाजप नेते प्रचारात सहभागी झाले होते. शिवाय, राज्य सरकारमधील मंत्र्यांनी सर्वच मतदारसंघांत जाऊन प्रचाराचे रान उठविले होते. सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार, खासदार अमोल कोल्हे; तर, कॉंग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, मधुसूदन मिस्त्री, काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा सुस्मिता देव यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करीत पुणेकरांकडे मते मागितली. त्याचवेळी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, इम्तियाज जलील यांनी आपल्या सभा गाजविल्या. तर, भाजप आणि दोन्ही काँग्रेसचा समाचार घेत आपचे नेते राघव चड्डा यांनी पुणेकरांशी संवाद साधला. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचाराला धार आली होती. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मतदारांच्या गाठीभेटी घेत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपला प्रचार आटोपला. 

कोथरूडमुळे रंगत 
पुण्यातील आठपैकी पाच मतदारसंघांत मनसेचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन सभा घेतल्या. भाजप नेत्यांवर सडकून टीका करताना राज यांनी मात्र कोथरूडमधील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यावरच आपला निशाणा रोखला. पाटील यांचा 'चंपा' असा उल्लेख करीत कोल्हापुरातील पुरातून ते कोथरूडपर्यंत वाहून आल्याची टिप्पणी त्यांनी केली. त्यामुळे कोथरूडमध्ये 'घरचा' की 'बाहेरचा' हा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे येथील निवडणुकीत रंगत वाढली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: End of election campaigning in rain and traffic congestion