Pune : उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam_Pashankar

उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

पुणे : सदनिका खरेदीसाठी पूर्ण पैसे भरूनही ग्राहकास ताबा व कागदपत्रे न देता फसवणूक केल्याप्रकरणात उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांनी हा आदेश दिला.या प्रकरणी गौतम विश्वानंद पाषाणकर (रा. सेनापती बापट रस्ता) यांच्यासह दोघांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिपालसिंह विजयसिंह ठाकोर (वय ६१, रा. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. पाषाणकर यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात देखील त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

पाषाणकर भागीदार असलेल्या ‘प्रॉक्सिमा क्रिएशन’ कंपनीच्या खराडी येथील ‘यिनयांग’ प्रकल्पात फिर्यादी यांनी एक कोटी ५६ लाख ६३ हजार ९८७ रुपये देऊन सदनिका खरेदी केली आहे. मात्र, फिर्यादी यांना सदनिकेचा ताबा देण्यात आला नाही. पाषाणकर यांनी फिर्यादी व या प्रकरणातील साक्षीदार महिंदर परसराम मनसे (रा. गीता सोसायटी, कॅम्प) यांना सदनिका विकण्यापूर्वी त्या सांगली येथील एका नागरी सहकारी पतसंस्थेकडे तारण ठेवून दोन कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्यामुळे पाषाणकर यांनी फिर्यादी व साक्षीदार यांची आर्थिक फसवणूक करून, त्यांच्या रकमेचा अपहार केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान व्यावसायात आलेल्या नुकसानीमुळे नैराश्यातून गौतम पाषाणकर हे बेपत्ता झाले होते.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पाषाणकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. मूळ फिर्यादी यांच्यातर्फे ॲड. सागर कोठारी व अॅड. नारायण पंडित यांनी बाजू मांडली. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पाषाणकर यांची कोठडी आवश्यक आहे, त्यांनी अशा प्रकारे सदनिका विकण्यापूर्वी त्या तारण ठेवून त्यावर कर्ज काढले आहे का, याबाबत तपास करायचा आहे, त्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला.

loading image
go to top