jejuri temple
jejuri templesakal

Jejuri News : गाभारा बंद असूनही जेजुरीत दिला जातोय व्हीआयपींना प्रवेश

जेजुरी येथील खंडोबा मंदिरात राज्य सरकारच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी देवसंस्थानच्या वतीने मुख्य गाभारा देवदर्शनासाठी बंद ठेवला आहे.

जेजुरी - येथील खंडोबा मंदिरात राज्य सरकारच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी देवसंस्थानच्या वतीने मुख्य गाभारा देवदर्शनासाठी बंद ठेवला आहे.

मात्र, देवसंस्थानचे विश्वस्त, त्यांचा परिवार व नातेवाईक आणि व्हीआयपी यांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. स्थानिक नागरिक व भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही, असा आरोप जेजुरी पालिकेचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी केला आहे.

याबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सोनवणे यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी गडावर विकास कामे सुरू आहेत. काम सुरू करण्यापूर्वी श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने ग्रामस्थांशी बैठक घेऊन मुख्य गाभारा व सभामंडपात कामे सुरु करण्यात येणार असून, ५ ऑक्टोबरपर्यंत गाभारा दर्शनसाठी सर्वांसाठी बंद राहील, असे जाहीर केले होते. ग्रामस्थांनी या निर्णयाला सहकार्य केले.

गाभारा दर्शनसाठी बंद केल्याने भाविकांची संख्या प्रचंड घटली. शहरातील व्यवसाय, धंदे पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा परिणाम शहराच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. पाच ऑक्टोबरपर्यंत गाभारा व सभामंडपाचे काम पूर्ण झाले नाही. आजही हे काम सुरु आहे. मात्र, देवसंस्थानचे विश्वस्त, त्यांचे परिवार, नातेवाईक व व्हीआयपींना थेट मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिले जात आहे. मात्र, जेजुरीकर व भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. असा दुजाभाव कशासाठी केला जातो?

‘‘जेजुरी गडावरील तेलाचा ठेका मुदतीच्या आत ठेकेदाराने सोडला आहे. सध्या देवसंस्थान तेल विक्री करीत आहे. त्यावर देवसंस्थानचे नियंत्रण आहे का? याबाबत आपण धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली आहे. गाभाऱ्यातील व सभामंडपातील कामे लवकर पूर्ण करावीत, सध्या गडावर घटस्थापनेचा उत्सव सुरु असून, दररोज सकाळी व सायंकाळी एक तास स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी गाभाऱ्यात प्रवेश द्यावा,’’ अशी मागणी हेमंत सोनवणे यांनी केली.

गडावर विकास कामे सुरू असताना नुकतेच एका टीव्ही चॅनेलवरील मालिकेने गडावर चित्रीकरण केले. ही परवानगी कुणी दिली? स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे. मंदिरात विकास कामे सुरु झाल्यानंतर मंदिरात कोणाकोणाला प्रवेश दिला, याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज देवसंस्थाकडे मागण्यात आले आहे, मात्र ते देण्यात टाळाटाळ करीत आहे.
- हेमंत सोनवणे, माजी नगरसेवक, जेजुरी (ता. पुरंदर)

‘ग्रामस्थांसाठी संध्याकाळी दर्शन खुले’
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात कामे चालू आहेत. ती अंतिम टप्प्यात आहेत. सध्या नवरात्र सुरू असल्याने संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्थानिक नागरिकांना खंडोबाच्या दर्शनाची व्यवस्था सुरू केली आहे.

मंदिरात सुरु असलेले काम पाहण्यासाठी काही अधिकारी व पदाधिकारी येतात ते व पूजा करणारे पुजारीच मंदिरात जातात. पुरातत्त्व विभागाने सांगितल्याप्रमाणे देवसंस्थान त्यांना सहकार्य करीत आहे. लवकरच भाविकांनाही मंदिर दर्शनासाठी खुले करून दिले जाणार असल्याचे देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे व विश्वस्त मंगेश घोणे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com