

भोर, ता. ४ : येथील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि समविचारी संस्था संघटनाच्या वतीने समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर समताभूमी (पुणे) ते क्रांतिभूमी (महाड) अशी समता फेरी होणार आहे.
या फेरीची सुरुवात २३ डिसेंबरला सकाळी पुण्यातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फुले वाड्यापासून होणार असून २७ डिसेंबरला महाड येथील चवदार तळ्याच्या काठावर त्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव यांनी दिली. मंडळाच्या भोरमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत या फेरीचे आयोजन करण्यात आले. समता फेरीचा पहिला मुक्काम महात्मा फुले यांच्या गावी खानवडी (ता.पुरंदर) येथे होणार आहे. दुसरा राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगाव (ता. खंडाळा) येथे होणार आहे. तिसरा मुक्काम स्वराज्यभूमी (भोर), तर चौथा मुक्काम रायगडाच्या पायथ्याशी होणार आहे. पाचव्या दिवशी महाड येथील चवदार तळ्याच्या काठावर फेरीचा समारोप होणार आहे. समता फेरीच्या नियोजनासाठी संयोजन समितीची स्थापना करण्यात आली असून डॉ. मेघना भोसले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून सातारा जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, तर विभागीय अध्यक्षांमध्ये चंद्रकांत जगताप (नवी मुंबई), विनोद शेलार (भोर), पंकज धिवार (पुरंदर), जगदीश कांबळे (वाई), चंद्रकांत गायकवाड (राजगड), दादासाहेब कांबळे (खंडाळा), संदीप गायकवाड व प्रशांत ढावरे (फलटण), तुषार कांबळे (खोपी-भोर) आदींसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सागर सोनकांबळे आदींचा समावेश आहे. शरद गायकवाड आणि मनिष यादव हे सचिवपदी राहणार आहेत. सहसचिवपदी प्रशांत अडसूळ, कोषाध्यक्षपदी सुजित कडाळे तर सहकोषाध्यक्षपदी विकास लक्ष्मण जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राहुल गायकवाड, सुनील मोरे, ॲड. किरण घोणे आदी या फेरीचे नियोजन करणार आहेत. या बैठकीस कायदेशीर सल्लागार ॲड. प्रवीण धेनक, वसंत साळवे, डॉ. सुरेश गोरेगावकर, कश्यप साळुंके, गोविंद रणखांबे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.