esakal | Erandwane : किरकोळ वादातून कुटुंबातील चौघांसह पाचजणांना जबर मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

erandwane

Erandwane : किरकोळ वादातून कुटुंबातील चौघांसह पाचजणांना जबर मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : घराजवळील जागेत सिमेंटचा कट्टा बांधण्याच्या कारणावरुन शेजाऱ्यांनी एकाच कुटुंबातील चौघांना लोखंडी हातोडा, फावड्याने जबर मारहाण केली. या घटनेत चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील मेगासिटी परिसरात घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुनील शिंदे (वय 38, रा. कर्वे रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील एरंडवणे येथील त्यांच्या राहत्या घराजवळ थांबले होते. त्यावेळी त्यांची मानलेली बहिण तेथून पळत जाताना त्यांना दिसली. त्यांनी तिला अडवून विचारणा केली.

तेव्हा तिने तिचा भाऊ मनोज पवार यास काहीजण मारण्यासाठी आल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे फिर्यादी तत्काळ मनोज पवारच्या घरी गेले. पवार राहात असलेल्या घराजवळ एक मंदिर आहे. तेथे पवार हा सिमेंटचा कट्टा बांधत होता. संबंधीत जागेवरुन पवार व त्याच्या शेजाऱ्यांची भांडणे होती.

फिर्यादी घटनेच्या ठिकाणी दाखल झाले, तेव्हा फिर्यादीची तोंडओळख असलेल्या संशयित आरोपींनी पवार हा मोकळ्या जागेत कट्टा बांधत असल्याच्या कारणावरुन त्यास शिवीगाळ व धक्काबुक्कीत करीत असल्याचे निदर्शनास आले. फिर्यादींनी मध्यस्थी करून भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने संशयित आरोपींनी फिर्यादीच्या डोक्‍यात लोखंडी हातोड्याने मारहाण केली.

तसेच मनोज पवार यांच्या डोक्‍यात लोखंडी फावडे घालून त्यांनाही जखमी केले. फिर्यादी शिंदे यांची बहिण, भाऊ व पत्नीलाही फावडे, दगडाने मारहाण केली. या घटनेत फिर्यादीच्या कुटुंबातील चौघेजण जखमी झाले. या घटनेनंतर संशयित आरोपींनी फिर्यादीच्या कारच्या काचा फोडून नुकसान केले. दरम्यान, या घटनेत आरोपींनाही मारहाण झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रमसिंह पवार करीत आहेत.

loading image
go to top