वाट बघतोय रिक्षावाला! पुणेकरांच्या सेवेसाठी लॉकडाऊनमध्ये 500 रिक्षा उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जुलै 2020

सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे महापालिका क्षेत्रात कडक लॉकडाऊन असेल. या दहा दिवसांच्या लॉकडाउनच्या काळात शहरातील आपत्तकालीन रिक्षा व्यवस्था सुरू राहणार आहे. 

पुणे, ता. 11 ः पुण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे महापालिका क्षेत्रात कडक लॉकडाऊन असेल. या दहा दिवसांच्या लॉकडाउनच्या काळात  शहरातील आपत्तकालीन रिक्षा व्यवस्था सुरू राहणार आहे. प्रामुख्याने वैद्यकीय  मदतीसाठी ही रिक्षा सेवा सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी 500 रिक्षा उपलब्ध असणार आहेत. 

शहर वाहतूक पोलिस आणि ऑटो ग्लाईड यांच्यातर्फे 25 मार्चपासून लागू झालेल्या पहिल्या लॉकडाउनमध्ये वैद्यकीय मदतीसाठी आणि अत्यावश्यक कारणांसाठी रिक्षा सेवा सुरू होती. त्यासाठी नागरिकांना 9859198591 या क्रमांकावर बुकींग करावे लागत आहे. पहिल्या लॉकडाउनच्या काळात सुमारे 63 हजार नागरिकांनी रिक्षासाठी दूरध्वनी केले होते. त्यापैकी सुमारे 22 हजार नागरिकांसाठी रिक्षा उपलब्ध झाली होती. रिक्षा प्रवासासाठी मीटरच्या दराच्या दुप्पट पैसे रिक्षाचालकाला द्यावे लागतात. म्हणजे मीटरवर 100 रुपये झाले असतील तर, प्रवाशाला 200 रुपये द्यावे लागतात. 

हे वाचा - पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सोमवारपासून लॉकडाऊन; या गावांचा असेल समावेश

शहरात 14 ते 23 जुलै दरम्यान लॉकडाउन होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यामध्येही सेवा उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेतील सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी दिली. तसेच वैद्यकीय मदत आणि अत्यावश्यक कारणासाठीच या रिक्षा उपलब्ध असतील. त्यासाठी सुमारे 500 रिक्षांना पास देण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउऩच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 387 रिक्षांना पोलिसांनी पास दिले होते. त्या काळात चालकांना 22 हजार फेऱयांतून सुमारे 95 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तसेच 200 रिक्षाचालकांना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सहकार्यातून  प्रत्येकी 1 लाख रुपयांचा विमा उपलब्ध करून देण्यात आला होता, अशी माहिती ऑटो ग्लाईडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शितोळे यांनी दिली. प्रवाशांनी रिक्षासाठी 9859198591 या क्रमांकावर कॉल केल्यावर त्यांना फॉर्म पाठविला जातो. तो त्यांनी भरून दिल्यावर रिक्षा उपलब्ध होईल की, नाही हे त्यांना सांगितले जाते. ही सुविधा अहोरात्र उपलब्ध असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Edit and Published By : सूरज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: essential service and medical emergency rickshaw available in pune city