

युरोपमधील आंदोलनांचा भडका शमेना
फ्रान्ससह इटली, अल्बानिया, स्पेन, पोर्तुगालमध्ये निदर्शने
पॅरिस, ता. २५ (वृत्तसंस्था) : वाढती महागाई, निवृत्तिवेतन, घरांच्या किमती, शिक्षण, भ्रष्टाचार आणि युद्धविरोधी भूमिकेवरून युरोपमध्ये पुन्हा एकदा आंदोलनांची लाट उसळली आहे. फ्रान्स, अल्बानिया, इटली, स्पेन आणि पोर्तुगालमधील अनेक शहरांमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले असून, काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला.
आतापर्यंतच्या आंदोलनांदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर युरोपमधील अनेक शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले असून, काही ठिकाणी सैनिकांचीही मदत घेण्यात आली आहे.
फ्रान्समध्ये सुमारे एक हजार आंदोलकांना अटक
फ्रान्समध्ये शनिवारी झालेल्या आंदोलनांदरम्यान जवळपास एक हजार जणांना अटक करण्यात आली. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे फ्रान्सचे गृहमंत्री लॉराँ न्युनेझ यांनी सांगितले. सरकारच्या आकडेवारीनुसार, देशभरात सुमारे चार लाख १० हजार लोक आंदोलनात सहभागी झाले होते. ‘‘आतापर्यंत जवळपास एक हजार जणांना अटक झाली आहे. हा आकडा वाढेल,’’ असे न्युनेझ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, फ्रान्समधील डाव्या विचारसरणीचे नेते आणि अध्यक्षपदाचे उमेदवार जाँ-ल्युक मेलाँशाँ यांनी पॅरिसमधील आंदोलन हाताळण्याच्या पोलिसांच्या पद्धतीवर टीका केली.
अल्बानियात सरकारविरोधात निदर्शने
अल्बानियाची राजधानी तिराना येथे शनिवारी हजारो नागरिक सरकारविरोधी आंदोलनासाठी एकत्र आले. विद्यार्थी, कलाकार आणि राजकीय गटांच्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.आंदोलकांनी सरकारी इमारतींवर हल्ले केले असून, अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. या आंदोलनांमध्ये ३०० हून अधिक आंदोलक आणि पोलिस जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इटलीत आठ शहरांमध्ये आंदोलन
इटलीतील मिलान, रोम, ट्युरिन, नेपल्स, बोलोनिया आणि फ्लॉरेन्ससह अनेक शहरांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. काही आंदोलकांनी बाटल्या, दगड आणि फटाके फेकले. शनिवारी आठ शहरांमध्ये झालेल्या आंदोलनांदरम्यान नऊ जणांना अटक करण्यात आली, तर ३७१ जणांना काही काळासाठी ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती इटलीच्या पोलिसांनी दिली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सुरक्षा यंत्रणांचे आभार मानले. काही हिंसक व्यक्तींनी संघर्ष घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तरी शांततेत आंदोलन करण्याचा नागरिकांचा अधिकार जपण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
स्पेनमध्ये निवृत्तिवेतनवाढीची मागणी
स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये आंदोलकांनी निवृत्तिवेतनातील वाढ प्रत्यक्ष महागाईशी जोडण्याची मागणी केली. किमान वेतनाच्या पातळीशी सुसंगत किमान निवृत्तिवेतन, महिला आणि पुरुषांच्या निवृत्तिवेतनातील तफावत कमी करणे तसेच सार्वजनिक निवृत्तिवेतन व्यवस्थेचे खासगीकरण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.
पोर्तुगालमध्ये परवडणाऱ्या घरांचा प्रश्न
पोर्तुगालमध्ये घरांच्या वाढत्या किमती हा आंदोलनाचा प्रमुख मुद्दा ठरला. घरांच्या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे मिळणे कठीण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.