आता संकल्प पुनर्बांधणीचा

 सचिन भोसले व रवींद्र शिंगणापूरकर
मंगळवार, 30 जून 2020

भीती,निराशा व नकारात्मकतेतून बाहेर पडून पुनश्‍च हरी ॐ करण्याची धडपड सुरू झाली आहे.आपले शहर पूर्ववत व चैतन्यमयी होण्यासाठी सर्व नियम पाळून जमिनीवर येऊन चालायला हवे.यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत

कोरोनाचे जीवन व्यवहारावरील परिणाम गंभीर व सर्वव्यापी आहेत. अशा काळात भीती, निराशा व नकारात्मकतेतून बाहेर पडून पुनश्‍च हरी ॐ करण्याची धडपड सुरू झाली आहे. आपले पुणे शहर पूर्ववत व चैतन्यमयी होण्यासाठी सर्व नियम पाळून जमिनीवर येऊन चालायला हवे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. 

पुणे हे ऐतिहासिक वारसा लाभलेले, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक गतिविधींचे व सामाजिक चळवळींचे केंद्र म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावलौकिक असलेले महत्त्वाचे शहर. इतिहासात अनेक चढ-उतार पाहिलेले, नव्याने उभारलेले, प्लेगची साथ, पानशेत धरणफुटीमुळे झालेली पडझड दुरुस्त करून औद्योगिक, शैक्षणिक भरभराटीचे केंद्र म्हणून पुणे शहर पुन्हा नावारूपाला आले.

आज कोरोना महामारीच्या संकटकाळात पहिल्या लॉकडाउनपूर्वीच अन्य गावे व अन्य प्रांतांतील विद्यार्थी व तिसऱ्या लॉकडाउननंतर अनेक कामगार परिवारासह गावी निघून गेले. शहर व परिसरातील बहुतेक कारखाने, कार्यालये, दुकाने, छोटे-मोठे व्यवसाय, शाळा, प्रार्थनास्थळे, उद्याने- बालोद्याने, टॅक्‍सी, बस व रेल्वे स्थानक, विमानतळ, सभा- संमेलने सर्व बंद. रस्ते ओस, व्हर्च्युअल ट्रॅफिक वेगाने, सर्व काही ऑनलाइन अशी परिस्थिती ओढवली होती.

आपले शहर पूर्ववत होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. सर्व काही सुरळीत व्हायला वेळ लागेल; पण फार उशीर करणे परवडणार नाही. हीच वेळ आहे संयमाची, निर्धाराची, परिश्रमाची. धडपड करावी लागेल व्यवसाय, उद्योग, शिक्षण, सामाजिक गतिविधी सुरू करण्यासाठी. योजना, परवाने, प्रशिक्षण, प्रबोधन व अर्थसाहाय्य देऊन, मदतीचा हात देऊन, हाती शक्ती अन्‌ पायी गती देऊन.

काही प्रयत्न सुरू झाले आहेत. याचेच व्यापक स्वरूप म्हणजे समर्थ भारत पुनर्बांधणी योजना. प्रत्येक हाताला काम, उदरनिर्वाहासाठी साधन, युवाशक्तीच्या कल्पना व मेहनतीला संधी, समाजाला चलनवलन व सामाजिकीकरण होऊन, पुणे शहर पुन्हा एकदा राष्ट्रजीवनात आपले योगदान देऊ शकेल. हे सर्व या योजनेतून होऊ शकेल, असाच संकल्प करूया पुनर्बांधणीचा!

समर्थ भारत पुनर्बांधणीचे तीन स्तर...
१) विविध क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींकडून दिशादर्शन
२) सुसूत्रीकरण, समन्वय
३) अंमलबजावणी

कशी करावी कार्य विभागणी
    सेवा क्षेत्र - आर्थिक सामाजिक सर्वेक्षण, गरजू घटकांची व स्वयंसेवकांची नोंदणी 
    कौशल विकास क्षेत्र - प्रशिक्षण 
    आर्थिक क्षेत्र - सुलभ कर्ज योजना, स्वयंरोजगारी तसेच उद्यम-व्यवसायींसाठी 
    औद्योगिक क्षेत्र - लघु-मध्यम, मोठ्या उद्योगांसाठी रोजगार जोडणी 
    व्यापार : रोजगार जोडणी, जीवनावश्‍यक वस्तूंची वाजवी दरात पूर्ती 
    आरोग्य क्षेत्र - स्थानिक वस्ती आरोग्य रक्षण, दक्षता, आरोग्य यंत्रणेशी समन्वय, प्रबोधन 
    शिक्षण क्षेत्र - ऑनलाइन शिक्षणासाठी शिक्षकांना अद्ययावत करून मुलांशी कनेक्‍ट करण्यासाठी तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देणे 
    समुपदेशन केंद्र - मानसिक- भावनिक आधार, सकारात्मकता
    तंत्रज्ञान - माहिती तंत्रज्ञान व इतर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Everyone should try to follow the rules to restore the city

टॅग्स
टॉपिकस