esakal | दाभोलकर हत्या कांड: CBIने न्यायालयात सादर केलेले पुरावे आरोपींना अमान्य
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra-Dabholkar

दाभोलकर हत्या कांड: CBIने न्यायालयात सादर केलेले पुरावे आरोपींना अमान्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयात सादर केलेले पुराव्यांशी संबंधित तेरा कागदपत्रे अमान्य असल्याचे आरोपींच्या वकिलांनी बुधवारी (ता. ६) न्यायालयात सांगितले. त्यामुळे सीबीआयला साक्षीदारांची यादी देऊन ही कागदपत्रे सिद्ध करावी लागणार आहेत.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोप निश्चिती झाली असून, आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ‘सीबीआय’ने गुन्हेगारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २९४ नुसार, पुराव्यासंबंधींची कागदपत्रे न्यायालयात सादर केली. त्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदनापूर्वीचा पंचनामा, मृत्यूची वैद्यकीय सूचना, फॉरेन्सिक प्रयोगशाळांचे अहवाल, आरोपीच्या कार्यालयातून दोन लॅपटॉप जप्त केल्याचा आणि आरोपींच्या छायाचित्रांचा मेमो, अशा तेरा कागदपत्रांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रे बचाव पक्षाच्या वकील अॅड. सुवर्णा आव्हाड यांनी नाकारली.

साक्षीदारांच्या यादीसाठी मुदत द्यावी :

आरोपींनी नाकारलेले पुरावे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची यादी सादर करण्यास काही दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली आहे. मागील सुनावणीवेळी बचाव पक्षाने केलेल्या मागणीनुसार, या प्रकरणाची केस डायरी सीलबंद स्वरूपात न्यायालयात सादर करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

"या प्रकरणात ‘सीबीआय’तर्फे न्यायालयात सादर केलेली सर्व कागदपत्रे बचाव पक्षाने नाकारली आहेत. त्यामुळे आता पुढील सुनावणीला साक्षीदारांची यादी दिली जाईल. त्यानंतर साक्षीदार तपासून ही कागदपत्रे सिद्ध करण्यात येतील."

अॅड. प्रकाश सूर्यवंशी, विशेष सरकारी वकील

loading image
go to top