बँक गैरव्यवहारप्रकरणी आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

शिवाजीराव भोसले बॅंक गैरव्यवहारप्रकरणी आमदार अनिल भोसले यांच्यासह अकरा जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी चौघांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे)

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. याप्रकरणी भोसले यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बॅंकेत 71 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आला आहे. या गैरव्यवहाराची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये आमदार भोसले यांच्यासह एस. व्ही. जाधव, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ आणि अधिकारी शैलेश भोसले यांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. अटक केलेल्या सर्वांना उद्या (बुधवारी) शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे. भोसले हे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीचे आमदार असले, तरी त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. पत्नी रेश्‍मा या भाजपच्या नगरसेविका आहेत.

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून त्या नोंदी खऱ्या असल्याचे भासविण्यात आले. या खोट्या नोंदीच्या माध्यमातून तब्बल 71 कोटी 78 लाख 87 हजार 723 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याप्रकरणी एकूण 11 जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी योगेश लकडे (वय 29, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल भोसले, त्यांची पत्नी रेश्‍मा भोसले, तानाजी पडवळ आदींवर गुन्हा दाखल झाला आहे. या बॅंकेच्या खातेधारकांनी जमा केलेल्या ठेवींच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होता. त्यानुसार बॅंकेचे 2018-19 या आर्थिक वर्षाचे शिल्लक रकमेचे ऑडिट करण्याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने आदेश दिला होता. फिर्यादी हे लेखापरीक्षक आहेत. त्यांच्या निदर्शनास हा गैरव्यवहार आला.

शिवाजीराव भोसले बॅंक गैरव्यवहारप्रकरणी आमदार अनिल भोसले यांच्यासह अकरा जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी चौघांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex MLA Anil Bhosale arrested for bank fraud case in Pune