Pune : सत्राच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्राच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा

सत्राच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा

पुणे : रोहन पाटील याने (नाव बदलले आहे) बी.एस्सीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला, ही प्रवेश प्रक्रिया साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाली आणि ऑक्टोबरमध्ये ऑनलाइन महाविद्यालये सुरू झाले. ऑक्टोबरच्या अखेरीस महाविद्यालयात प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आणि लगेचच रोहनचे पहिले सत्र संपले. दिवाळीनंतर आता दुसरे सत्र सुरू होत असताना पहिल्या सत्राची परीक्षा, दुसऱ्या सत्राचा अभ्यास आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा अशी सर्व धावपळ सुरू झाल्याने रोहनला अभ्यासक्रम पूर्ण करायचा कसा, अशा चिंतेने ग्रासले आहे.

पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेनंतर आकांक्षा पवार (नाव बदलले आहे) हिचे संबंधित महाविद्यालयातील ऑनलाइन शिक्षण ऑक्टोबरमध्ये सुरू झाले. दरम्यान ऑक्टोबरच्या अखेरीस पहिले सत्र संपत असतानाच प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू झाले. अशात आता दिवाळीनंतर दुसरे सत्र सुरू असताना पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम समजलेला नसताना दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम सुरू झालाय आणि पहिल्या सत्राची परीक्षेची तयारी, दुसऱ्या सत्राच्या परीक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे आकांक्षाने सांगितले.

पारंपारिक अभ्यासक्रमात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र जूनमध्ये सुरू झाले. त्यावेळी ऑनलाइनद्वारे अभ्यासक्रम शिकविण्यास सुरवात झाली. परंतु प्रत्यक्षात बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रिया सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सुरू होती. अशात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेल्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार पहिले, तिसरे, पाचवे सत्र ऑक्टोबरच्या अखेरीस संपले. दिवाळीच्या सुटीनंतर दुसरे आणि चौथे सत्र सुरू झाले आहे. याआधीच्या सत्राच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत. तसेच पुढील सत्राच्या परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया काही प्रमाणात सुरू होत असल्याने विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत.

पदवी अभ्यासक्रमाचे पहिले सत्र संपले आणि दुसरे सत्र सुरू झाले आहे. पण प्रत्यक्षात पहिल्या सत्राच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत. दुसरे सत्र सुरू असताना विद्यार्थ्यांना पहिल्या सत्राच्या परीक्षांची तयारी, दुसऱ्या सत्राचा अभ्यास आणि परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण वाढणार असल्याचे चित्र आहे. मुळातच पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत सुरू राहिली. त्यामुळे विद्यापीठ स्तरावरून पहिल्या सत्राचा कालावधी वाढविणे अपेक्षित होते, परंतु तसे न झाल्याने विद्यार्थ्यांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे.

- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय (गणेशखिंड)

शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीच्या सत्राची ‘टर्म एण्ड’ ऑक्टोबरमध्ये झाली असली, तरी प्रत्यक्षात पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सत्राचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे या सत्रातील परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी २०२२ दरम्यान घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे विद्यार्थी- प्राध्यापक यांनी काळजी करू नये. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांना आणि अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. या सत्राच्या परीक्षा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पुढील सत्र सुरू होईल आणि त्या पुढील सत्राच्या परीक्षा जून-जुलै २०२२ मध्ये होतील.

- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

loading image
go to top