थरांचा थरार अन्‌ तरुणाईचा जल्लोष 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

 गोविंदा रे गोपाळा.. यशोदेच्या तान्ह्या बाळा, गोविंदा आला रे आला... लाल लाल पागोटा गुलाबी शेला... कृष्णा पडते रे पाया दही-दूध देते रे खाया... यांसह अनेक हिंदी गाण्यांवर तरुणाईने धरलेला ठेका... स्पीकर्सच्या भिंतींमधला धडकी भरविणारा आवाज... फलकांची भाऊगर्दी आणि गोविंदांच्या थरांचा थरार अशा जल्लोषमय वातावरणात शहरात शनिवारी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

पुणे : गोविंदा रे गोपाळा.. यशोदेच्या तान्ह्या बाळा, गोविंदा आला रे आला... लाल लाल पागोटा गुलाबी शेला... कृष्णा पडते रे पाया दही-दूध देते रे खाया... यांसह अनेक हिंदी गाण्यांवर तरुणाईने धरलेला ठेका... स्पीकर्सच्या भिंतींमधला धडकी भरविणारा आवाज... फलकांची भाऊगर्दी आणि गोविंदांच्या थरांचा थरार अशा जल्लोषमय वातावरणात शहरात शनिवारी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

पावसाने उघडीप घेतल्याने नागरिकांनी दहीहंडी पाहायला बाहेर पडणे पसंत केले. मात्र, पावसाच्या हुलकावणीमुळे दहीहंडी काहीशी कोरडी ठरली. चौकाचौकांत क्रेनच्या उंच टोकावर फुलांनी सजविलेल्या दहीहंड्या, रस्त्यावर केलेला लेझर शो आणि दिव्यांच्या झगमगाटात गाण्यांच्या दणदणाटात बेभान होऊन तरुण नाचत होते. हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी उपनगरांसह मध्यवर्ती भागातील लोकांनी गर्दी केली होती. सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील नटराज दहीहंडी पथकाच्या गोविंदांनी सहा थर रचून रात्री नऊ वाजून सात मिनिटांनी फोडली. त्यानंतर हुतात्मा बाबू गेनू मंडळाची दहीहंडी शिवतेज गोविंदा पथकाने सात थर रचून 10 वाजून 5 मिनिटांनी फोडली. 

संध्याकाळी सहानंतर सुरू झालेल्या स्पीकर्सच्या भिंतींचा दणदणाट रात्री दहानंतरही सुरू होता. अनेक मंडळांनी उत्सवादरम्यान लाउड स्पीकरसह ढोल-ताशा पथकांचे वादनही ठेवले होते. दहीहंडीची उंची वीस फुटांपेक्षा अधिक नको आणि बाल गोविंदांच्या सहभागासंदर्भात काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाकडून फटकारले जात असले, तरी त्यात फारसा बदल जाणवला नाही. काही मंडळांनी हजारो रुपयांचे पारितोषिक जाहीर केल्याने हंडी फोडण्याची स्पर्धा लागली होती. इंदापूर, भोर, बारामती, दौंड, मुंबईसह अनेक ठिकाणांहून गोविंदांची पथके पुण्यामध्ये दाखल झाली होती. तसेच, मावळ भागातून ढोल-ताशा आणि साहसी खेळांची पथकेही शहरात दाखल झाली होती. गोविंदांना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून रोपची व्यवस्था करण्यात आली होती. 

सिनेतारकांची हजेरी अल्प 
हडपसर, कात्रज, कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता, धायरी, बाणेर, औंध, चंदननगर आणि वडगाव शेरी या उपनगरांमधील मंडळांनी मोठ्या प्रमाणात साउंड सिस्टिम लावले होते. उपनगरांतील काही मंडळे दरवर्षी आकर्षण म्हणून अभिनेत्री किंवा अभिनेत्यांना बोलावत असतात. मात्र, या वर्षी पूरपरिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेत्री किंवा अभिनेत्यांना कमी प्रमाणात बोलाविण्यात आले होते. शहरातदेखील हे प्रमाण घटले होते. 

साधेपणाने उत्सव 
सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील पुराच्या आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर काही मंडळांनी उत्सवाच्या खर्चात कपात करून पूरग्रस्तांना मदत केली, त्यामुळे या वर्षी काही ठिकाणी साधेपणाने दहीहंडी साजरी करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: excitement and thrill of Dahi Handi celebration of the youngsters in Pune pimpari