esakal | तरूण बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने उडाली खळबळ I Murder
sakal

बोलून बातमी शोधा

तरूण बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने उडाली खळबळ

तरूण बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने उडाली खळबळ

sakal_logo
By
नितीन बारवकर

शिरूर - गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या येथील तरूण बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह आज (ता. २९) सकाळी, पुणे - नगर रस्त्यावरील नारायणगव्हाण (ता. पारनेर) शिवारातील विहिरीत आढळून आल्याने व त्याच्या चेह-यावर आणि शरीरावर मारहाणीच्या खूणा आढळून आल्याने खळबळ उडाली. 'आमच्या मुलाचा खून करून त्याला विहीरीत फेकून दिले असून, आरोपींना तात्काळ अटक करावी', या मागणीसाठी शिरूरमधील तरूणांनी व मृत बांधकाम व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी सुमारे दोन तास पुणे - नगर रस्ता रोखून धरल्याने नारायणगव्हाण परिसरात मोठा गोंधळ झाला.

आदित्य संदीप चोपडा (वय २४, रा. हुडको वसाहत, शिरूर) असे मृत बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्याच्या कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनूसार, आदित्य सोमवारी (ता. २७) कडूस या मूळगावी गेला होता. तेथून परतताना रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्याने कुटूंबियांशी संपर्क साधून बेलवंडी फाटा येथे असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही. रात्री आठ नंतर त्याचा मोबाईलही बंद लागल्याने त्याच्या कुटूंबियांनी व हुडको परिसरातील तरूणांनी बेलवंडी फाटा, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण परिसरात त्याचा शोध घेतला असता नारायणगव्हाण जवळील नवले मळ्यानजीक रस्त्याकडेला त्याची दूचाकी मिळून आली. परिसरात चौकशी केली असता, तीन तरूणांशी त्याची किरकोळ हुज्जत झाली व त्यांनी त्याला त्यांच्या दूचाकीवर बसवून नेल्याची माहिती मिळाल्याने आदित्यच्या कुटूंबियांनी सुपे पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्याचे अपहरण झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी तत्काळ दखल घेण्याऐवजी दुस-या दिवशी येण्यास सांगितले. काल (ता. २८) दिवसभर थांबूनही संध्याकाळी आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली.

दरम्यान, आज सकाळी ११ च्या सुमारास नारायणगव्हाण जवळील नवले मळ्यातील विहिरीत आदित्यचा मृतदेह आढळला. सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी पोलिस दलासह घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक ग्रामस्थ व तरूणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी आदित्यच्या चेह-यावर व शरीरावर मारहाणीच्या खूणा आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळताच, शिरूरमधील आदित्यच्या मित्रांनी, नातेवाईकांनी, हुडको व परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त नातेवाईकांनी आरोपींचा शोध घेतल्याशिवाय मृतदेह हलवू न देण्याचा पवित्रा घेतला. काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर त्यांची नावे जाहीर करा व खूनाचा गुन्हा दाखल करा, अशी आग्रही मागणी नातेवाईकांनी केल्याने गोंधळ वाढत गेला. त्यातच माजी केंद्रीय मंत्री दिलिप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी घटनास्थळी येऊन हा खूनाचा प्रकार आहे व या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. त्यावेळी संतप्त जमावाने पुणे - नगर महामार्ग रोखून धरला.

दरम्यान, डीवायएसपी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, गोकावे यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर पकडल्याशिवाय मृतदेह पोस्टमार्टेमसाठी हलवू देणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने मोठा गोंधळ झाला. या गोंधळातच सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गु्न्हे अन्वेशनच्या पथकामार्फत केला जाईल व दोषींची गय केली जाणार नाही, असे आश्वासन पाटील यांनी दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

हेही वाचा: भंगार व्यावसायिक व भिक्षेक-यांमुळे खुनाच्या गुन्ह्याची झाली उकल

आदित्य चोपडा याच्या मृत्युबाबत नेमकी माहिती समोर आली नसल्याने मृत्युच्या कारणावरून शहर व परिसरात उलट - सुलट चर्चा चालू आहे. बांधकाम व्यवसायातील स्पर्धेतूनच ही घटना घडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. पारनेर तालुक्यातील रस्त्यांची व इतर छोटी - मोठी कामे आदित्य घेत होता. ज्या नवले मळ्यातील विहिरीत त्याचा मृतदेह आज आढळून आला त्याच नवले मळ्याकडे जाणा-या रस्त्याच्या काॅक्रीटीकरणाचे काम त्याने घेतले होते. त्यातून वितुष्ट आलेल्या प्रतिस्पर्ध्यांनी त्याचा घात केला असल्याचा आरोप स्थानिक तरूणांनी केला. या प्रकरणी सुपे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे पोलिस निरीक्षक गोकावे यांनी सांगितले.

loading image
go to top