सोमेश्वर कारखाना करणार डिस्टिलरीचे विस्तारीकरण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

सोमेश्वरच्या डिस्टिलरीचे विस्तारीकरण करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. उसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवायचा प्रकल्प करायचा, की आहे तसाच प्रकल्प वाढवायचा याबाबत "व्हीएसआय'चा सल्ला घेऊन नियोजन करून वार्षिक सभेत मांडणार आहोत. 

सोमेश्वरनगर (पुणे) : काळाची पावले ओळखून सोमेश्वरच्या डिस्टिलरीचे विस्तारीकरण करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. उसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवायचा प्रकल्प करायचा, की आहे तसाच प्रकल्प वाढवायचा याबाबत "व्हीएसआय'चा सल्ला घेऊन नियोजन करून वार्षिक सभेत मांडणार आहोत. 

सभेत सभासदांना विचारूनच अंतिम दरातून प्रतिटन 100 रुपये कपात करणार आहोत. ही कपात परतीची ठेव असेल आणि त्यावर 12 टक्के व्याज दिले जाईल, अशी स्पष्ट भूमिका सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी मांडली. मुरूम (ता. बारामती) येथे ग्रामस्थ मंडळातर्फे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा व अधिकाऱ्यांचा 2018-19 हंगामात राज्यात उच्चांकी प्रतिटन 3300 रुपये अंतिम भाव दिल्याबद्दल आणि कारखाना कर्जमुक्त केल्याबद्दल जाहीर सत्कार आयोजित केला होता. या वेळी जगताप बोलत होते. 

याप्रसंगी उपाध्यक्ष शैलेश रासकर, ज्येष्ठ संचालक नामदेव शिंगटे, किशोर भोसले, सिद्धार्थ गीते, लालासाहेब माळशिकारे, लक्ष्मण गोफणे, महेश काकडे, मोहन जगताप, ऋतुजा धुमाळ, विशाल गायकवाड, वित्त व्यवस्थापक बाळासाहेब कदम, शेती अधिकारी बापूराव गायकवाड उपस्थित होते. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, बारामती दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, हंबीरराव जगताप, संचालक सुनील भगत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मनोहर कदम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अमोल जगताप यांनी केले. हरिश्‍चंद्र जगताप यांनी आभार मानले. 

सर्वोच्च भाव 
सोमेश्वरने मागील हंगामात एफआरपीपेक्षा 358 रुपये, तर यावर्षीही एफआरपीपेक्षा 526 रुपये जास्त दर दिला. दोन्ही वर्षांत एफआरपीपेक्षा जादा रक्कम देण्यात सोमेश्वर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, असे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. या वर्षी उच्चांकी गाळप, उच्चांकी उतारा मिळविला, उच्चांकी वीजनिर्मिती केली, यामुळे 3300 रुपये असा सर्वोच्च भाव देता आला. सभासद, कामगार, अधिकारी यांना हे श्रेय जाते, अशा संचालक मंडळाच्या भावना असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expansion of the distillery to be operated by Someshwar factory