थ्री डी तंत्राद्वारे डोळ्यांवर शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

 मोतिबिंदू, काचबिंदूच्या शेकडो शस्त्रक्रिया करणाऱ्या शहर आणि परिसरातील १५० डॉक्‍टरांनी रविवारी पुण्यात प्रथमच ‘थ्री डी’ तंत्रज्ञानातून शस्त्रक्रिया करण्याचा पहिला धडा गिरवला.

पुणे - मोतिबिंदू, काचबिंदूच्या शेकडो शस्त्रक्रिया करणाऱ्या शहर आणि परिसरातील १५० डॉक्‍टरांनी रविवारी पुण्यात प्रथमच ‘थ्री डी’ तंत्रज्ञानातून शस्त्रक्रिया करण्याचा पहिला धडा गिरवला. यात डोळ्याचा पडदा, मोतिबिंदू आणि काचबिंदूच्या पाच रुग्णांवर ‘थ्री डी’ तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला निमित्त होते ते राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेतर्फे (एनआयओ) आयोजित कार्यशाळेचे!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘एनआयओ’तर्फे ‘थ्री डी’ तंत्रज्ञानातून नेत्रशस्त्रक्रियेवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे औपचारिक उद्‌घाटन कर्नल मदन देशपांडे यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे उपस्थित होते.  

‘थ्री डी’ तंत्रज्ञान डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी कसे वापरतात, हे दाखविण्यासाठी पाच वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात मोतिबिंदू, काचबिंदूसह डोळ्याच्या पडद्याची समस्या झालेल्या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या पाचही शस्त्रक्रियेतील अचूकता नव्या तंत्रज्ञानामुळे कशी साधता येते, याचे प्रशिक्षण नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. पंकज बेंडाळे यांनी दिले. 

कर्नल देशपांडे म्हणाले, ‘‘केळकर कुटुंबीयांनी तंत्रज्ञान हे कायमच रुग्णसेवेसाठी खुले केले. ते कधीच फक्त स्वतःपुरते वापरले नाही. आधुनिक काळात नवीन तंत्रज्ञान हे महागडे आहे. प्रत्येक डॉक्‍टरांना ते घेणे आर्थिकदृष्ट्या परवडेलच असे नाही. त्यामुळे ‘थ्री डी’सारखे अद्ययावत तंत्रज्ञान शिकण्यासाठी, ते अभ्यासण्यासाठी आजची कार्यशाळा महत्त्वाची  ठरली.’’

‘थ्री डी’ शस्त्रक्रिया म्हणजे काय?
शस्त्रक्रिया करताना शल्यचिकित्सकांना तो अवयव त्रिमितीय पद्धतीने टीव्हीच्या पडद्यावर दिसतो. प्रत्यक्षातील अत्यंत लहान प्रतिमान कित्येक पटीने मोठी करून अत्यंत स्पष्टपणे या ‘हाय डेफिनेशन टीव्ही’च्या पडद्यावर दिसते. त्यामुळे डोळ्यासारख्या अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेल्या अवयवातील अत्यंत सूक्ष्म रक्तवाहिन्या, अवघ्या काही मिलिमीटर जाडी असलेले पापुद्रे मोठ्या आकारात शल्यचिकित्सकांना पाहता येतात. त्या आधारावर टीव्हीच्या पडद्यावर पाहून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेला ‘थ्री डी’ शस्त्रक्रिया म्हणतात.

अशी होते शस्त्रक्रिया
‘आर्टेवो ८०० डिजिटल मायक्रोस्कोप’च्या माध्यमातून नेत्रपटलाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ‘मायक्रोस्कोप’मधून संगणकाच्या मदतीने ‘एचडी टीव्ही’वर प्रतिमा दिसते. ही प्रतिमा प्रत्यक्षापेक्षा कित्येक पट मोठी, स्पष्ट आणि त्रिमितीय दिसते, हे याचे वैशिष्ट्य आहे. शस्त्रक्रिया सुरू असतानाच डोळ्याच्या बदलणाऱ्या दाबाची क्षणाक्षणाची माहिती डॉक्‍टरांना कळते. त्यामुळे डोळ्यातील सूक्ष्म पापुद्य्राचे निरीक्षण करणे आता करणे शक्‍य झाले आहे. या सर्व गोष्टींमुळे नेत्रशस्त्रक्रिया अधिक सुरक्षित झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eye Surgery with 3D Technique

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: