Pune : झेडपी सीईओंच्या डोणजे येथील भेटीत धक्कादायक बाबी समोर

निलेश बोरुडे
Wednesday, 27 January 2021

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मुला-मुलींची शाळेपासून वंचित राहण्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत.

किरकटवाडी(पुणे): पुणे जिल्हा परिषदेमार्फत सध्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम सुरू असून त्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील कातकरी वस्तीला भेट दिली. डॉक्टर आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार मागासलेल्या समाजातील मुला-मुलींच्या शिक्षण व आरोग्याबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आदिवासी समाजातील मुलींचे कमी वयात लग्न होत आहेत. तसेच अद्यापही पालक मुलांना शाळेत पाठवत नसल्याची माहिती समोर आली आहे. 

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मुला-मुलींची शाळेपासून वंचित राहण्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच या सर्वेक्षणातून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांतील मुला-मुलींच्या आहार व आरोग्याबाबतही माहिती संकलित करण्यात येत आहे. डॉक्टर आयुष प्रसाद यांनी अचानक डोणजे गावातील प्राथमिक शाळा व कातकरी वस्तीला भेट दिली. यावेळी आयुष प्रसाद यांनी कातकरी कुटुंबांशी संवाद साधून त्यांना मुला-मुलींच्या शिक्षण, आहार व आरोग्याबाबत स्वतः माहिती दिली.

"पंचायत समितीच्या माध्यमातून महिला व बालविकासासाठी असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी शाळाबाह्य मुले आढळून येत आहेत त्या संबंधित पालकांचे प्रबोधन करून व विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन  मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात येणार आहे."
- पूजा पारगे, महिला व बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद, पुणे.

"बऱ्याच मुलांची नावे शाळेत दाखल आहेत परंतु पालक अज्ञान व दारिद्र्यामुळे त्यांना शाळेत पाठवत नाहीत. आदिवासी समाजातील मुलींचे कमी वयात लग्न होत असल्याचेही आढळून आले आहे. काही मुला-मुलींच्या बाबतीत पालक त्यांच्या आहाराकडे योग्य लक्ष देत नसल्याचे दिसून आले आहे. मतिमंद मुलांच्या बाबतीतही पालकांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. काही फार्म हाऊस वर बालकामगार काम करत असल्याचेही आढळून आले आहे. या सर्व प्रश्नांबाबत जिल्हा परिषदेकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. कातकरी, भिल्ल,पारधी व धनगर समाजातील नागरिकांसाठी त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठीही जिल्हा परिषदेमार्फत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे."
- डॉ.आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

 यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती हवेलीच्या महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी दत्तात्रय मुंढे, हवेली पंचायत समितीचे एकात्मिक बालविकास अधिकारी महेंद्र वासणिक, ग्रामपंचायत सदस्य शेखर पारगे, रोहिणी कुंभार, अंगणवाडी सेविका कविता अंदुरे, प्रियंका पायगुडे, अश्विनी वांबिरे, सामाजिक कार्यकर्ते शंकर चव्हाण, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी निफाडकर व काही ग्रामस्थ उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the face of shocking matters during the meeting of ZP CEOs at Donje