एक फेसबूक पोस्ट अन् पुण्यात टिळेकर-मोरे यांच्यात पुन्हा ठिणगी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांना गोळ्या घालणार होतो, पण घोडा अडकल्याने ते वाचले असा फोन कॉल एकाने आमदार योगेश टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर यांना केला. त्यांनी त्यासंदर्भातील पोस्ट फेसबुकवर टाकली. त्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत पोस्ट हटवली.

पुणे : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांना गोळ्या घालणार होतो, पण घोडा अडकल्याने ते वाचले असा फोन कॉल एकाने आमदार योगेश टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर यांना केला. त्यांनी त्यासंदर्भातील पोस्ट फेसबुकवर टाकली. त्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत पोस्ट हटवली. या सर्व प्रकारामुळे वसंत मोरे यांनी टिळेकर यांच्यावर आक्षेप घेऊन हा त्यांचाच बनवा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या एका फोन कॉलमुळे हडपसर मतदारसंघातील राजकारण ढवळून निघाले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून आमदार टिळेकर आणि वसंत मोरे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. मोरे हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच आमदार टिळेकर यांच्या गैरव्यवहारांच्या फाईल्सची महापुजा घालून आंदोलन केले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे. मोरे यांनी याविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

"मी वसंत मोरेंवर फायरिंग करायला गेलो होतो, पण घोडा अडकला. माझ्यावर आता गुन्हा दाखल होईल मला वाचवा, मदत करा' असा एकाने टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर यांना गुरूवारी रात्री फोन केला. त्यावेळी चेतन यांनी "याचा आमच्याशी काही संबंध नाही, तुमचे गावातील वाद गावात मिटवा' असे सांगितले.

दरम्यान, याच संदर्भात चेतन यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. त्यानंतर अवघ्या सहा मिनिटात ती काढून टाकली. आमदार टिळेकर यांनीही वसंत मोरे यांच्या मित्राच्या नावावर हा प्रकार घातला. मोरेंना काळजी घेण्यास सांग असे त्याला सांगितले.
हा प्रकार वसंत मोरे यांना कळाल्यानंतर त्यांनी हा सर्व बनाव आमदार टिळेकर यांनीच रचल्याचा संशय व्यक्त करत या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ज्याने चेतन टिळकर यांना फोन केला, त्याची चौकशी करा, फोन कॉल्स तपासून सत्य समोर आणा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. 

येवलेवाडीचा डीपीचा विषय असो किंवा हडपसर मतदारसंघातील कोणताही विषय वसंत मोरे हे आमदार टिळेकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तर थेट गोळीबाराचा विषय आल्याने हडपसर मतदारसंघात टिळेकर-मोरे यांच्यातील वाद आणखी तीव्र झाले आहेत.

दरम्यान, याबाबत आमदार टिळेकर म्हणाले, याच्याशी माझा काहीही संबंध नाही, फोन करणारा कोण आहे हे माहिती नाही, त्यामुळे चेतन यांनी फेसबुकवरील पोस्ट काढून टाकण्यास सांगितली. फोन करणाऱ्या विरोधात कोंढवा पोलिसांकडे तक्रार केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार म्हणाले, वसंत मोरे यांनी तक्रार अर्ज दिला आहे, पण अद्याप त्याबाबात कोणताही पुरावा मिळालेला नाही. याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A facebook post and a clashes between Tilekar and Vasant More in Pune