
मैत्रेयी बोरसे नावाच्या तरुणीने तिच्या आजोबांना उपचारांसाठी व शस्त्रक्रियेसाठी नामांकीत रुबी हॉल क्लिनीक रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचारही सुरू झाले, त्यानंतर दोन दिवसांनी तरुणी रुग्णालयात असतानाच तिला आयसीयूच्या डेस्कवर आपल्यासाठी फोन असून कुलकर्णी डॉक्टरांना तुमच्याशी बोलायचे असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले.
पुणे ः रुग्णालयात आजोबांना शस्त्रक्रियेसाठी घेऊन गेली. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी रुग्णालयाच्या आयसीयु डेस्कवरुन फोन येतो. डॉक्टर कुलकर्णी बोलत असल्याचे सांगून "तुमच्या आजोबांची तब्येत खराब असून त्यासाठी त्यांना इंजेक्शन द्यावे लागेल. त्यासाठी मला 50 हजार रुपये पाठवा.' असे सांगितले. हा सर्व प्रकार फसवणुकीचा डाव असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने थेट रुग्णालयाकडे तक्रार केली. थेट रुग्णालयात फोन करुन रुग्णाच्या नातेवाईकाकडून पैसे उकळण्याच्या प्रकाराची रुग्णालयानेही तातडीने दखल घेत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
मैत्रेयी बोरसे नावाच्या तरुणीने तिच्या आजोबांना उपचारांसाठी व शस्त्रक्रियेसाठी नामांकीत रुबी हॉल क्लिनीक रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचारही सुरू झाले, त्यानंतर दोन दिवसांनी तरुणी रुग्णालयात असतानाच तिला आयसीयूच्या डेस्कवर आपल्यासाठी फोन असून कुलकर्णी डॉक्टरांना तुमच्याशी बोलायचे असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. त्यामुळे मैत्रेयी व तिचा लहान भाऊ दोघेही आयसीयु डेस्कजवळ पोचले. त्यांनी फोन घेऊन बोलण्यास सुरूवात केली. तेव्हा, "तुमच्या आजोबांची तब्येत खूपच खराब असून त्यांना तातडीनं इंजेक्शन द्यायचे आहे. त्यासाठी मला 50 हजार रुपये पाठवा.' असे फोनवरील व्यक्तीने सांगितले. त्यासाठी तरुणीला बॅंक खाते क्रमांकही दिला. तरुणीने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. तेवढ्या कालावधीत संबंधीत व्यक्तीचे 10 फोन येऊन गेले. तोपर्यंत हा फसवणूकीचा प्रकार असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. या प्रकरणाची रुग्णालयानेही गांभीर्याने दखल घेऊन याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पैसे मागण्याचा हा प्रकार मुलीने मला सांगितला. त्यावेळी त्याच्याशी बोलताना संबंधीत व्यक्ती फसवणुक करण्याच्या उद्देशाने बोलत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत रुग्णालयाकडे लेखी तक्रार केली. त्याचबरोबर रुग्णालयातील रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची माहिती बाहेर कशी जाते. मी बॅंकेत असल्याने मला हा प्रकार लक्ष्यात आला. मी संबंधीत व्यक्तीला भेटून रोख रक्कम देतो म्हणून सांगितले, परंतु तो व्यक्ती आला नाही.'' विजय बोरसे, रुग्णाचा मुलगा.
"या सगळ्या प्रकरणावर रुग्णालयाने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केलीय. यापुर्वी रुग्णालयात असा प्रकार कधी घडला नाही. रुग्णालय कोणालाही असे फोन करीत नाही. रुग्णालय पैसे भरल्यानंतर पैसे भरल्याची पावती देते.''
- रवी कुमार, प्रशासकीय प्रमुख. रुबी हॉल क्लिनिक.
"नागरीकांनी हॉस्पिटलमध्ये पैसे भरतांना काळजी घ्यावी, असे आम्ही वारंवार आवाहन केले आहे. रुबी हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकारची दखल घेऊन आम्ही पुढील कारवाई करणार आहोत. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे.''
- राजकुमार वाघचौरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.