

बनावट डॉक्टर बनविणारे रॅकेट उघड
तीन राज्यांत जाळे; पाच आरोपींना अटक
नवी मुंबई, ता. १८ : परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊनही एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्रे मिळवून देत डॉक्टर बनविण्याचा प्रयत्न करणारे आंतरराज्य रॅकेट महाराष्ट्र सायबर पोलिसांनी उघडकीस आणले. या रॅकेटमधील दोन डॉक्टरांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशपर्यंत रॅकेटचे जाळे पसरल्याचे स्पष्ट झाले.
परदेशातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करून शासकीय रुग्णालयात एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण करावी लागते, मात्र या रॅकेटमधील आरोपींनी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्रे, इंटर्नशिप पूर्ण केल्याची कागदपत्रे आणि अंतिम प्रमाणपत्रे बनावट पद्धतीने तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे २२ विद्यार्थ्यांनी वैद्यकीय नोंदणीसाठी अर्ज केले होते. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या अधिकाऱ्यांनी अर्जांची पडताळणी केली असता परीक्षा निकाल आणि सादर केलेल्या प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळली. त्यानंतर कौन्सिलच्या रजिस्ट्रार यांनी तक्रार दिल्यानुसार महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासात २२ विद्यार्थ्यांचे अर्ज एकाच साखळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. बुलडाणा येथील दोन डॉक्टरांना प्रथम अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत नाशिकचा राहुल पाटील हा एजंट बनावट प्रमाणपत्रे मिळवून देत असल्याचे उघड झाले. त्यानंतर राहुल पाटीलला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील धर्मेंद्र आणि उत्तर प्रदेशातील शुभम सिंग यांचा सहभाग समोर आला. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. अशा प्रकारे आतापर्यंत पाच आरोपीना अटक करण्यात आली आहे.
१५ ते २० लाखांचा दर
या रॅकेटने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये अनधिकृत प्रवेश करून नोंदी केल्याचा संशय असून, त्यासाठी वापरलेल्या तांत्रिक पद्धतीचा तपास सुरू आहे. विद्यार्थ्यांकडून बनावट प्रमाणपत्रांसाठी १५ ते २० लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
शोध सुरू
दोन संशयित पोलिसांच्या रडारवर असून, त्यांचा शोध सुरू आहे. बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यापासून पोर्टलमध्ये नोंदी करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.