

बनावट डॉक्टरच्या
उपचारामुळे तरुणाचा मृत्यू
मध्य प्रदेशातील प्रकार; चार तासांत नऊ इंजेक्शन टोचली
जबलपूर, ता. १५ (पीटीआय) : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील बेलखाडू येथील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान इंजेक्शन दिल्यानंतर १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी वैद्यकीय पात्रता नसताना उपचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सतीश साहू याला अटक केली आहे. त्याची बहीण डॉ. सरिता साहू हिचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत.
शेखर चौधरी (वय १८) याला दोन ऑक्टोबरच्या रात्री पोटदुखीचा त्रास सुरू झाला. कुटुंबीयांनी त्याला बेलखाडू येथील अश्विनी रुग्णालयात दाखल केले. तेथे सतीश साहू याने सुमारे चार तासांत नऊ इंजेक्शने दिली. त्यानंतर काहीसा आराम मिळाल्याने कुटुंबीय त्याला घरी घेऊन गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा पोटात जळजळ आणि वेदना सुरू झाल्याने त्याला रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी सतीश याने इंजेक्शनमिश्रित सलाईन दिले. उपचार सुरू असतानाच शेखरचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर कटंगी पोलिसांनी मृत्यूची चौकशी सुरू केली. तपासात सतीश याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी पात्रता किंवा वैध कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या तपासणीत सरिता साहू हिच्याकडेही वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक पात्रता नसल्याचे उघड झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या दोघांकडून मुदतबाह्य औषधे वापरून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचेही आढळल्याचे वृत्त आहे. संबंधित रुग्णालयाची नोंदणीही झालेली नव्हती. या प्रकारानंतर प्रशासनाने रुग्णालय सील केले असून, मुदत संपलेली औषधे जप्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.