

दोन महिन्यांत ३५ भोंदूबाबांविरोधात गुन्हे
खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; महिलांच्या शोषणासह आर्थिक फसवणुकीची अनेक प्रकरणे उघड
नाशिक, ता. १६ : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला रविवारी (ता.१७) दोन महिने पूर्ण होत असून, या कालावधीत राज्यभरात ३५ भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या गुन्ह्यांचे संकलन केले असून, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी याबाबत माहिती दिली.
‘अंनिस’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नाशिक येथे घडलेल्या अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर भोंदूबाबांविरोधात कारवाया सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी पीडितांनी स्वतः पुढाकार घेत तक्रारी दाखल केल्या, तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नांतून गुन्हे नोंदविण्यात आले. या प्रकरणांमध्ये महिलांचे शोषण, शारीरिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक यांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. भीती, सामाजिक प्रतिष्ठा आणि बदनामीच्या धास्तीमुळे अनेक पीडित महिला अद्याप पुढे येण्यास घाबरत असल्याचेही अंनिसने म्हटले आहे. मात्र, अशोक खरात प्रकरणानंतर अनेक महिलांना लढण्याचे धैर्य मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही भोंदूगिरीचे प्रकार उघड होत असून, पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि भोंदूपणाचे वाढते जाळे चिंतेचा विषय ठरत असल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे.
या भोंदूबाबांविरोधात कारवाई
अशोक खरात (नाशिक), गडगेबाबा राजेंद्र गडगे (संगमनेर), चेतन माळी (मूर्तिजापूर), पंकज घोलप (येडगाव), मोहन भोसले (कुर्डुवाडी), नाना बर्डे (आळेफाटा), ऋषिकेश वैद्य (वसई), अल्ताफ रईस खान (मालाड), रिधम पांचाळ (मालाड), गणेश शिंदे (श्रीरामपूर), अर्जुन चव्हाण ऊर्फ टनटन बाबा (नवी मुंबई), विठोबा वाल्मीक जाट (सातपूर), किसन तळपे (मंदोशी), महेशगिरी ऊर्फ महेश काकडे (लासलगाव), अब्दुल शेख (खालापूर), इरफान नियाज अहमद (कांदिवली), अनिल सोलोमन सिंग (पुणे), शिवराम सावर (पालघर), अल्ताफ मदारी (जळगाव), नाना महाराज ऊर्फ गुरु माऊली वीरकर (टेंभुर्णी), पिंटू धुमाळ (बारामती), हेमदास बावणे (अड्याळ), चंद्रकांत माळी (इगतपुरी), अशोक आढाव (श्रीरामपूर), औदुंबर गडदे (स्वारगेट), नवनाथ गवळी (खेड), शाहिद शेख (खडकपाडा), शिव सोनवणे (सर्जेपुरा), ज्ञानेश्वर कोरडे (बिलोली), रमेश गुप्ता (मालाड), हरिगिरी दत्तगिरी महाराज (भाग्यनगर), मंजुनाथ शेट्टी ऊर्फ दीक्षित (ठाणे), कृष्णा ऊर्फ भगत सुभाष चित्ते (देवपूर, धुळे), यशवंत थोरात (पारनेर) आणि श्याम महाराज राठोड (दिघी).
कोट
ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत भोंदूगिरीची प्रकरणे समोर येत आहेत. विविध धर्मांतील व्यक्तींवर कारवाई झाल्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ एका धर्मापुरते मर्यादित असल्याचा दावा फोल ठरला.
— कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.