

पोलिस असल्याचे सांगून
शेतकऱ्याचे दागिने लंपास
महूद ते दिघंची-आटपाडी मार्गावर घटना
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. २ : महूद ते दिघंची- आटपाडी मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध शेतकऱ्याच्या अंगावरील सुमारे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना ३० सप्टेंबर रोजी दुपारी घडली.
याबाबत हरिदास साधू बंडगर (वय ६९, रा. कटफळ, ता. सांगोला) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंडगर हे ३० सप्टेंबर रोजी कामानिमित्त महूद येथे गेले होते. काम आटोपून दुपारी चारच्या सुमारास दुचाकीवरून कटफळकडे जात असताना महूद शिवारातील पाण्याच्या टाकीजवळ मागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडविले. ‘आम्ही पोलिस आहोत. तुमच्या अंगाची झडती घ्यायची आहे,’ असे सांगून त्यांनी बंडगर यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. झडतीचे कारण विचारले असता, त्यातील एका व्यक्तीने रुमाल बंडगर यांच्या तोंडावर फिरविला. त्यानंतर काही वेळ आपल्याला काहीच कळले नसल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन आणि १७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख ८० हजार रुपये आहे. बंडगर यांनी मुलगा संभाजी याला घटनेची माहिती दिल्यानंतर दोघांनी महूद, कटफळ तसेच पंढरपूर, अकलूज व सांगोला मार्गावर संशयितांचा शोध घेतला; मात्र ते सापडले नाहीत. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.