तीस वर्षांचा संसार झालेल्या जोडप्याचा कौटुंबिक दावा तडजोडीअंती निकाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Family Court

पत्नीने पतीविरोधात केलेली कौटुंबिक वादाची तक्रार पुणे कौटुंबिक न्यायालयात तडजोडीअंती निकाली काढण्यात आली आहे.

तीस वर्षांचा संसार झालेल्या जोडप्याचा कौटुंबिक दावा तडजोडीअंती निकाली

पुणे - कौटुंबिक वाद (Family Dispute) करीत घरखर्च देत नाही. आमचा सांभाळ करीत नाही. तसेच पतीने दुसरे लग्न केले आहे, अशा कारणांमुळे पत्नीने पतीविरोधात केलेली कौटुंबिक वादाची तक्रार कौटुंबिक न्यायालयात (Family Court) तडजोडीअंती निकाली (Result) काढण्यात आली आहे. या जोडप्याचे लग्न होऊन ३० वर्ष उलटले आहे. त्यांची मुलगी देखील या प्रकरणात तक्रारदार आहे.

मुलीच्या लग्नाचा खर्च, पत्नीसह मुलाला तहहयात शिवणे येथील बंगल्यात राहण्यास परवानगी आणि पत्नीस उदरनिर्वाह खर्च वाढवून देत दरमहा १३ हजार रुपये देण्याचा निर्णय होऊन हा दावा निकाली काढण्यात आला. या मध्यस्थीसाठी पतीचे वकील ॲड. सुचित मुंदडा आणि पत्नीचे वकील ॲड. ए. जे. मोमीन यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

हेही वाचा: स्टार्टअपची संख्या वाढवण्यासाठी ‘पुणे फिनटेक मीटअप’ चे आयोजन

पत्नी रेखा आणि मुलगी पूजा यांनी वडील रमेश (सर्व नावे बदललेली), चुलते, आजी विरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्याप्रमाणे अर्ज केला होता. रमेश हे केंद्रीय सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. या जोडप्याची मुलगी उच्चशिक्षित आहे. वेगवेगळ्या कारणावरून मुलगा, मुलगी, आई आणि वडील यांच्यामध्ये सातत्याने वाद होत होते. तसेच पती घरखर्च देत नाही, माझा सांभाळत नाही, त्याने दुसरे लग्न केले आहे, अशी तक्रार करीत रेखा यांनी रमेश यांच्याविरोधात कौटुंबिक दावा दाखल केला होता. पतीने पोटगी द्यावी, राहते घर विकू नये व त्या घरात आम्हाला राहू द्यावे, अशी मागणी पत्नीने केली होती.

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पत्नीसह मुलीला दरमहा पाच हजार रुपयांची अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर याबाबत अर्ज प्रलंबित असतानाच मुलीचे लग्न जमले. दरम्यान दावा निकाली काढताना पोटगी पाच हजार रुपयांवरून १३ हजार रुपयापर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला. तर मुलीच्या लग्नासाठी सहा लाख रुपये देण्याचे पतीने मान्य केले.

सर्व पुरवूनही मुलगी माझ्याशी बोलत नाही

मी बांधलेल्या बंगल्यात पत्नीसह मुले राहतात. माझ्याशी बोलत नाहीत. मला जेवण देत नाही. वयस्कर आईसोबत वाद करून पत्नीने आईपासून मुलाला वेगळे केले. मुलीला मी उच्च शिक्षण देत गाडी, मोबाईल, लॅपटॉप अशा वस्तू पुरवल्या आहेत. तरीही ती बोलत नाहीत. सर्वांसोबत भांडण काढत असते. तर मुलगा शिक्षण घेत नाही, असे म्हणणे रमेश यांनी मांडले होते.

Web Title: Family Claim Couple Married For 30 Years Was Settled Amicably Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..