आळंदीत मुलीसह जावयाला मारहाण; आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा

आळंदीत मुलीसह जावयाला मारहाण; आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा

Published on

आळंदी,ता. २६ : आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले याचा राग मनात धरून विवाहित मुलगी व जावयाला शिवीगाळ आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात आई-वडील, बहीण, दाजी यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २४) दुपारी बारा वाजता आळंदी येथील रिद्धिसिद्धी मंगल कार्यालय जवळ घडली. याबाबत फिर्याद श्रावणी बाळासाहेब देशमुख (वय २१, रा. वाल्हेकर वाडी चिंचवडे नगर, ता. हवेली) यांनी बुधवारी (ता. २५) आळंदी पोलीस ठाण्यामध्ये दिली.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावणी देशमुख यांनी त्यांचा मित्र शिवाजी गंगाधर राजेगोरे यांचे सोबत आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. त्याचा राग मनात धरून आई वडील बहीण दाजी यांनी तिला बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर निकिता यांनी शिवाजी राजेगोरे याला लाकडी दणक्याने डोक्यावर छातीवर आणि पाठीवर मारहाण करून दुखापत केली. याबाबत बाळासाहेब निळकंठ देशमुख, मनीषा बाळासाहेब देशमुख (दोघेही रा. वाल्हेकर वाडी चिंचवडेनगर, ता. हवेली) या आई-वडिलांसह बहिण ऐश्वर्या ज्ञानेश्वर कांबळे, दाजी ज्ञानेश्वर कांबळे ( दोघेही रा. आंबेठाण चौक खेड ), बहिणीची मैत्रीण निकिता ( पूर्ण नाव नाही ), वहिनीचा मानलेला भाऊ माऊली कोळेकर (रा. महाळुंगे ता खेड ), आणि इतर अनोळखी व्यक्ती विरोधात आळंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com