अपघातानंतर तीन वर्षे मृत्यूशी झुंज अपयशी; विवाहितेच्या कुटुंबीयांना मिळणार 62 लाखांची भरपाई

टीम ई सकाळ
Friday, 5 March 2021

अपघात झाल्यानंतर त्यातून बरे होण्यासाठी विवाहितेने तीन वर्ष लढा दिला. मात्र तिची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. याबाबत नुकसान भरपाई मिळण्यासाठी पतीने दाखल केलेला दावा समुपदेशनाद्वारे निकाली काढण्यात आला.

पुणे -  अपघात झाल्यानंतर त्यातून बरे होण्यासाठी विवाहितेने तीन वर्ष लढा दिला. मात्र तिची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. याबाबत नुकसान भरपाई मिळण्यासाठी पतीने दाखल केलेला दावा समुपदेशनाद्वारे निकाली काढण्यात आला. त्यात पतीला 62 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, स्नेहल गणेश धुमाळ असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. स्नेहल या पदवीचे शिक्षण घेत होत्या. शेजाऱ्यांबरोबर त्या अक्कलकोट येथे देव दर्शनाला गेल्या होत्या. प्रवासावेळी एका वळणावर त्यांची कार पलटली. 4 एप्रिल 2015 रोजी झालेल्या या अपघातात स्नेहल यांना गंभीर दुखापत झाली होती.

स्नेहल यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. सुरवातीला त्यांना सोलापूर येथील एका रुग्णालयात उपचार देण्यात आले. त्यानंतर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तीन वर्षे त्यांच्यावर उपचार सुरू होता. त्यानंतर 23 मार्च 2018 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तीन वर्ष सुरू असलेल्या उपचारांसाठी 50 लाख रुपये खर्च आला होता.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

याबाबत पतीने कार मालक आणि विमा कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स विरोधात मोटार अपघात न्याय प्राधिकरणात दावा दाखल करत 80 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती. जिल्हा न्यायाधीश एस. एन. सोनवणे यांनी हे प्रकरण समुपदेशानासाठी ॲड. अतुल गुंजाळ यांच्याकडे पाठविले. ॲड. गुंजाळ यांनी दोनदा समुपदेशन केल्यानंतर हे प्रकरण निकाली निघाले. अर्जदारांकडून ॲड. एस. जी. जोगवडीकर यांनी तर विमा कंपनीच्या वतीने ॲड. सुनील द्रविड यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family will get 62 lakh after women death in car accident