agn Gopinath Accident Assistance Scheme 05082026_txt.txt

agn Gopinath Accident Assistance Scheme  05082026_txt.txt
Published on

शेतकरी अपघात सुरक्षा योजनेची
मदत आता थेट आयुक्तालयातून

विलंब टाळण्यासाठी ‘एसएओ’चा स्तर वगळला; योजनेचे कामकाज पूर्णपणे ऑनलाइन

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचे कामकाज आता पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार असून, अर्जाची सद्यःस्थितीही ऑनलाइन पाहता येणार आहे. तसेच मदत वितरणातील विलंब टाळण्यासाठी यापुढे अनुदानाची रक्कम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) कार्यालयामार्फत न पाठवता थेट कृषी आयुक्तालयातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
योजनेतील ऑफलाइन प्रक्रिया बंद करण्यात आली असून, जानेवारी २०२६ पासून राज्यभरातून सुमारे ६५०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सुमारे २५०० अर्ज शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर सानुग्रह अनुदानासाठी आहेत. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना दोन लाख रुपये, एका अवयवाचे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये, तर दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
यापूर्वी अपघातानंतर ३० दिवसांच्या आत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करणे बंधनकारक होते. आता महाडीबीटी संकेतस्थळावरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जाची प्राथमिक छाननी संबंधित क्षेत्रातील उपकृषी अधिकारी करतील. त्यानंतर अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल. तालुका कृषी अधिकारी अर्जाची पडताळणी करून तो तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठवतील.
सदर समितीला अर्ज पात्र किंवा अपात्र ठरविण्याचा अधिकार असेल. समितीने अर्ज नामंजूर केल्यास संबंधित शेतकरी किंवा लाभार्थ्याला जिल्हास्तरीय समितीकडे अपील करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती लाभार्थ्यांना घरबसल्या मिळणार आहे.


भूमिहीन शेतमजुराच्या
व्याख्येबाबत संभ्रम
या योजनेत भूमिहीन शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र ‘भूमिहीन शेतमजूर’ ही व्याख्या नेमकी कोणाला लागू होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने काही प्रमाणात संभ्रम आहे. योजनेच्या सुधारित नियमावलीत ही व्याख्या स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com