

फलोत्पादन विकास अभियानातून
शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नाशिक : अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना फलोत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी योजना विभागातून संबंधित योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कांदा चाळ, सामूहिक शेततळे व शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती (नेटहाऊस, पॉलिहाऊस), विड मॅट, प्लॅस्टिक मल्चिंग, फार्म गेट पॅक हाऊस, फळबाग लागवड, भाजीपाला क्षेत्र विकास, मसाला व फलपिक लागवड, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनशीत, ऐकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया युनिट, रेफ्रिजरेटेड वाहने व शीतगृह व साठवणूक सुविधा आदी विविध पायाभूत सुविधांसाठी अनुदान देण्यात येते. संबंधित घटकांसाठी शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ, संरक्षित शेती आणि शेततळे अस्तरीकरण यांसारख्या घटकांसाठीही अनुदानाची तरतूद आहे. या योजनांमुळे शेतमालाची साठवणूक, उत्पादनाची गुणवत्ता, पाणी व्यवस्थापन आणि फलोत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी शेतकरी असावा. अर्जदाराकडे स्वतःच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक असून, अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी वैध जातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. अर्जासाठी आधार कार्ड, सातबारा उतारा, आठ-अ उतारा, बँक पासबुक, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी तसेच आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. संबंधित योजनेच्या घटकानुसार शासनाने निर्धारित केलेली पात्रता व कागदपत्रांची पूर्तता करावी.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्जातील माहिती अचूक भरावी. अर्जाची छाननी व लाभार्थी निवड शासनाच्या प्रचलित नियमांनुसार करण्यात येईल. अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी फलोत्पादन विकासासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती घेऊन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.