

‘फार्मर आयडी’अभावी १० हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती रखडली
--
आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार ९८८ पात्र शेतकऱ्यांची यादी बँकांकडे प्राप्त झाली आहे. मात्र, या प्रक्रियेत १० हजार २८८ शेतकऱ्यांकडे ''फार्मर आयडी'' नसल्याने त्यांच्या कर्जमुक्तीच्या लाभाला अडथळा निर्माण झाला आहे. याशिवाय ७८ हजार ७८८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नसल्याने त्यांचीही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण व ॲग्रिस्टॅक नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन महसूल व सहकार विभागाने केले आहे.
शासनाने जाहीर केलेल्या लाभार्थी याद्यांमध्ये नाव असणे हा लाभ मिळण्याचा अंतिम निकष नसून, ''फार्मर आयडी'', आधार प्रमाणीकरण आणि पोर्टलवरील माहितीची पडताळणी या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम मंजूर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत, सेवा सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र किंवा संबंधित महसूल कार्यालयातून लाभार्थी यादी तपासून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कर्जमाफीसाठी पोर्टलवर दर्शविलेली ३१ मार्चपर्यंतची कर्जबाकीच ग्राह्य धरण्यात येणार आहे. पोर्टलवरील रक्कम आणि प्रत्यक्ष कर्जबाकीमध्ये तफावत असल्यास संबंधित बँक शाखा किंवा कार्यकारी सेवा संस्थेकडे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तक्रारींचे निवारण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीकडून केले जाणार आहे. आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम डीबीटीद्वारे थेट जमा केली जाईल. त्यानंतर संबंधित बँकेकडून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) राजेंद्र भुयार यांनी दिली.
--
चौकट
कर्जमुक्ती योजनेची सद्यस्थिती
योजना : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६
पात्र शेतकरी : २,७६,९८८
''फार्मर आयडी'' नसलेले शेतकरी : १०,२८८ (३.७० टक्के)
आधार प्रमाणीकरण प्रलंबित : ७८,७८८ (२८.४४ टक्के)
अनिवार्य अट : ॲग्रिस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण
ग्राह्य कर्जबाकी : ३१ मार्चपर्यंतची पोर्टलवरील रक्कम
तक्रार निवारण : संबंधित बँक/कार्यकारी सेवा संस्था व जिल्हास्तरीय समिती
रक्कम वितरण : आधार प्रमाणीकरणानंतर डीबीटीद्वारे थेट खात्यात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.