

‘हेक्टरी १ लाख मदत द्या’
येवला : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी तालुका काँग्रेस समितीतर्फे सोमवारी (ता.१९) येथील तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी केलेल्या घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. येवला तालुका काँग्रेसतर्फे मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार विवेक चांदवडकर यांना देण्यात आले. पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी दुष्काळात होरपळत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे,अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, राष्ट्र सेवा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष दिनकर दाणे, राजेंद्र पगारे, संजय मिस्त्री, बाबासाहेब शिंदे, विद्याभूषण दुगड, नानासाहेब शिंदे, जयप्रकाश वाघ, समाधान पडवळ, डॉ.दिगंबर गायकवाड, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.
-------
निबंध स्पर्धेत
सृष्टी ठोंबरे प्रथम
येवला : जलसंपदा विभागातर्फे जलसेवा संकल्प अभियानाअंतर्गत जळगाव नेऊर येथील शाळेत ‘भविष्यासाठी पाण्याचे महत्त्व’ या विषयावर निबंध स्पर्धा झाल्या. यात सृष्टी ठोंबरे हिने प्रथम क्रमांक मिळवला. जलसिंचन शाखा (एरंडगाव) आणि नेऊरगावच्या अजिंक्यतारा पाणी वापर संस्थेतर्फे स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. जळगाव नेऊर येथील शाळेत हा उपक्रम घेण्यात आला.उपविभागीय अधिकारी समीर साळवे यांनी पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले.शाखाधिकारी मिलिंद पगार यांनीही पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले. ‘मविप्र’चे तालुका संचालक नंदकुमार बनकर यांनी सहकार्य केले. अजिंक्यतारा संस्थेचे सचिव देविदास कदम यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनी: प्रथमः सृष्टी विठ्ठल ठोंबरे (नववी),द्वितीय आरती अशोक सोनवणे (दहावी),तृतीय:मयूरी गणेश रसाळ (दहावी
----------
उदमांजराची पिले आढळली
सिन्नर : शहराजवळील बोडके वस्तीवर फटाका गुदामातून उदमांजरासह पाच पिलांना ताब्यात घेण्यात आले. वन विभागाने त्यांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. अतुल बोऱ्हाडे यांच्या फटाका असलेल्या गोदामामध्ये ही मांजरे दिसून आली. याबाबत वन विभागाला माहीत देण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ अधिकारी, प्रीतिश सरोदे, वनरक्षक संतोष चव्हाण, वन्यजीव बचाव पथकाचे निखिल वैद्य, रोहित लोणारे, शुभम टिंगरे यांनी उदमांजर सुरक्षितपणे रेस्क्यू करून ताब्यात घेतले. एक मादी व पाच पिले असे सहा उदमांजर मिळून आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.