बारामतीतील शेतकऱ्यांना यंदा जाणवणार कांद्याच्या रोपांचा तुटवडा  

विजय मोरे
Thursday, 10 September 2020

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील गावात रविवारी (ता. १६) रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश्य पावसाने खरीप हंगामातील बाजरी, मूग, कांदा, सोयाबीन, मका व ऊस आदी पिके भुईसपाट झाली आहेत.

उंडवडी (पुणे) : बारामतीच्या जिरायती भागात दर वर्षी शेतकरी रब्बी हंगामात नगदी पीक म्हणून कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. या पिकावर शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक नियोजन असते. त्यामुळे खरीप हंगामातच बियाण्यांपासून रोपांची निर्मिती केली जाते. या रोपातून स्वतःची कांदा लागवड करून इतर शेतकऱ्यांना रोपांची विक्री केली जाते. यंदा मात्र अतिरिक्त पावसाने अनेकांची कांद्याची रोपे जागेवरच जळून गेली आहेत. त्यामुळे यंदा कांद्याची रोपे आणि बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील गावात रविवारी (ता. १६) रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश्य पावसाने खरीप हंगामातील बाजरी, मूग, कांदा, सोयाबीन, मका व ऊस आदी पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, कारखेल, अंजनगाव, बऱ्हाणपूर, जराडवाडी, जळगाव सुपे आदी परिसरात रविवारी रात्री दोन तास वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. या पावसाची सोनवडी सुपे येथे 131 मिलिमीटर नोंद झाली. 

कोरोनाबाधितांसाठी कॅशलेस सेवा, पण लूट सुरूच

परिसरात बहुतांश शेतकऱ्यांची बाजरीची पिके हातातोंडाशी आली होती. मात्र, अतिरिक्त झालेल्या पावसामुळे बाजरी भुईसपाट होऊन पाण्यात गेली. तसेच, अनेक शेतकऱ्यांचे कांदा पीक व कांद्याच्या रोपांची नासाडी झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात लागवडीसाठी कांद्याचे रोपे दुर्मिळ झाली आहेत. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यानुसार या पिकांचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागाने सुरु केले आहे. सोनवडी सुपे येथे गावकामगार तलाठी सुनंदा फुंदे व कृषी सहायक अण्णासाहेब पासले यांनी तहसीलदार विजय पाटील व तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरु केले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Baramati will face shortage of onion seedlings this year