कास - कुसुंबी कोळघर रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या जमिनींचे अतोनात नुकसान....

कास - कुसुंबी कोळघर रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या जमिनींचे अतोनात नुकसान....
Published on

कुसुंबी- कोळघर रस्त्यावर शेतजमिनींचे नुकसान

पाचवड ते खेड महामार्गामध्‍ये बाधित झालेल्‍या शेतकऱ्यांना मोबदल्‍याची प्रतीक्षा कायम

सातारा, ता. १२ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा पश्चिम महाराष्ट्र ते कोकण या विभागांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण महामार्गापैकी असलेल्या पाचवड- मेढा- सह्याद्री नगरमार्गे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या ठिकाणी कोकणाला जोडणाऱ्या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या रस्त्यामध्ये कुसुंबी ते सह्याद्रीनगर गावादरम्यान असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात बाधित झाल्या असून, त्‍यांना अद्याप कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही.
कुसुंबी- कोळघर हा दहा वर्षांपूर्वी झालेला नवीनच रस्ता आहे.‌ यापूर्वी १९८० च्या दशकातील दुष्काळात सरकारने लोकांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेतून कुसुंबी व सांगवी तर्फ मेढा गावच्या डोंगरामधून डोंगरमाथ्याला जोडणारा रस्ता काढला होता; परंतु हा रस्ता अर्धवटच राहिला. त्यानंतर डोंगरमाथ्यावर गावांना जाण्यासाठी पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. शशिकांत शिंदे जावळीचे आमदार असताना रोजगार हमी योजनेतून हा रस्ता काढून त्याचे काम दुसऱ्या योजनेत टाकून करण्यात आले. विशेष म्हणजे त्या वेळेला शेतकऱ्यांच्या वतीने रिपब्‍लिकन पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष संजय गाडे यांनी या कामाला विरोध करून तहसीलदारांकडे तक्रार केली असता तत्कालीन तहसीलदारांनी शेतकऱ्यांनाच उलट नोटीस काढत तुमच्या जमिनीमध्ये उत्खनन झाले असून, त्याचा दंड भरा, असा फतवा काढला. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय तर मिळालाच नाही, वरून त्यांच्या मागे शुक्लकाष्ट लावण्यात आले. हा रस्ता करताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून तो जात आहे, त्यांच्या जमिनीच्या सातबाराचे कोणत्याही प्रकारचे अधिग्रहण केलेले नाही, तरीही आत्ता महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात रस्त्यामध्ये गेल्या आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला असता शासनाकडून काहीही मिळणार नाही, अशी उत्तरे संबंधितांकडून देण्यात आली.
नुकत्याच झालेल्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या सभेत कुसुंबीचे ग्रामस्थ संजय गाडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर ही बाब घातली. त्‍यावेळी संबंधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्‍यासंदर्भात श्री. शिंदे यांनी ग्वाही दिली होती; पण याबाबत पुढे काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. आज शेतकऱ्यांच्या सातबारावर जमिनीचे कोणतेही अधिग्रहण नसताना त्यांच्या जमिनीतून महामार्ग जात आहे; पण त्यांचे नुकसान म्हणून एक रुपया मिळत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ते लक्ष घालून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
....................................................
डोंगरकपारीतील शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरून होणारा विकास आम्हाला मान्य नाही. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे ठेकेदाराच्या प्रेमापोटी दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच जावळीचे सुपुत्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या कानावर हा विषय घालावा लागला. ते नक्कीच शेतकऱ्यांना न्याय देतील, हा आम्हाला आत्मविश्वास आहे.
- संजय गाडे,
ग्रामस्थ, कुसुंबी
...................................................

फोटो :.........KSS26B04553
सांगवी तर्फ मेढा (ता. जावळी) : पाचवड ते खेड महामार्गाच्या कामासाठी कुसुंबी घाटात काढण्‍यात येत असलेला रस्‍ता.
......................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com