

पीक पाहणीच्या नावाखाली
सातबाऱ्यामागे १०० रुपयांची मागणी
पैसे न दिल्यास पीक पाहणी रोखल्याचा आरोप; शेतकऱ्यांची अडवणूक
मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : देवळा तालुक्यात ई-पीक पाहणीसाठी सातबारा उताऱ्यामागे १०० रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पैसे न दिल्यास पीक पाहणी करण्यास नकार दिला जात असल्याचे, तसेच काही गटांची नोंद अपूर्ण ठेवली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कापशी येथील शेतकरी गणेश भदाणे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले की, संबंधित पीक पाहणी सहाय्यक पेट्रोल खर्चाचे कारण देत पैशांची मागणी करत आहेत. एका शेतकऱ्याचे चार ते पाच गट असल्यास ४०० ते ५०० रुपये द्यावे लागत असल्याची तक्रार त्यांनी केली. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच पैशांअभावी कोणत्याही शेतकऱ्याची पीक पाहणी अपूर्ण ठेवू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पावसाअभावी खरीप हंगाम अडचणीत सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यातच पीक पाहणीसाठी पैशांची मागणी होत असल्याने त्यांच्या अडचणींत भर पडली आहे. शासनाकडून पीक पाहणी सहाय्यकांना मानधन दिले जात असतानाही अतिरिक्त पैशांची मागणी का केली जाते, असा सवाल उपस्थित होत आहे.
‘पटत नसेल तर पाहणी करून नका’
पीक पाहणीसाठी १०० रुपयांऐवजी ५० रुपये घेण्याची विनंती केली असता, ‘पटत नसेल तर आमच्याकडून पीक पाहणी करून घेऊ नका,’ असे उत्तर दिले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक भगवान जाधव यांनी केला. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेताची पीक पाहणीही केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘थेट तक्रार करा; संबंधितांवर कारवाई करू’
‘‘संबंधित सहाय्यकाविरुद्ध नावासह तक्रार प्राप्त झाल्यास पुरावे तपासून कारवाई केली जाईल. याबाबत सहाय्यकांच्या गटावर वारंवार सक्त सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना स्वतः किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मदतीने ई-पीक पाहणी करता येते. सहाय्यकाला कोणतेही अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. अडचण आल्यास ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,’’ असे देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.