

पान १
निविष्ठा घोटाळ्यावरून
आयुक्तालयावर आंदोलनाचे सावट
सर्व योजनांना डीबीटी लागू करण्याची मागणी
अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर डीबीटीविना झालेल्या निविष्ठा खरेदीची राज्यस्तरीय चौकशी करण्याच्या मागणीसाठी कृषी आयुक्तालयात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे कृषी विभागातील अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. दरम्यान, ‘या घोटाळ्यातील लबाडांना शोधून बाजूला करू,’ अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंदोलनकर्त्यांना दिली आहे.
डीबीटीला बगल देत धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून २१.३७ कोटी रुपयांची निविष्ठा खरेदी करण्यात आली. त्यातील सुमारे दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे चौकशीत निष्पन्न होऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी २९ जून रोजी पुण्यातील कृषी आयुक्तालयाच्या छतावर चढून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे कृषी विभागाच्या कामकाजाविषयी राज्यभर चर्चा झाली. पोलिसांच्या मध्यस्थीने ते आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र त्यानंतरही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत मुंबईतील मरीन ड्राइव्ह आणि पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यांना पत्र देऊन आंदोलनाची माहितीही देण्यात आली आहे.
विस्तार संचालकांच्या दालनात सोमवारी आंदोलन
आंदोलनानंतरही कृषी विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप करत शेतकरी आता थेट विस्तार संचालक रफिक नाईकवाडी यांच्या दालनात आंदोलन करणार आहेत. याबाबतचे लेखी पत्र कृषी सचिवांना पाठविण्यात आले आहे.
पत्रात म्हटले आहे, की धाराशिव येथील घोटाळ्याच्या चौकशीसाठी आम्ही २० एप्रिल २०२६ पासून पाठपुरावा करीत आहोत. मात्र, दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही. हा घोटाळा राज्यभर झाल्याची शक्यता असल्याने राज्यस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणीही केली. मात्र कृषी आयुक्तालयाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे येत्या सोमवारी (ता. २०) विस्तार संचालकांच्या दालनात शेतकरी उपोषण करणार आहेत. त्यानंतरही दखल घेतली नाही, तर मुंबईतील कृषी सचिवांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करू. या परिस्थितीस घोटाळेबाज अधिकारी आणि त्यांना साथ देणारी यंत्रणा जबाबदार असेल.
कोणालाही सोडणार नाही : कृषिमंत्री
शेतकरी प्रतिनिधी अमोल जाधव यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून डीबीटीला बगल देत निविष्ठा खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसेच चौकशी होऊनही कारवाई होत नसल्याची तक्रार मांडली.
यावर उत्तर देताना कृषिमंत्री भरणे म्हणाले, की या प्रकरणी शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. तसेच आमदार कैलास पाटील यांनीही मला पत्र दिले आहे. शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती नेमली आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही कोणालाही सोडणार नाही. यातील लबाडांना शोधून बाजूला केले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.