

कोरडा दुष्काळ जाहीर करा
अडगाव बुद्रुक येथे रास्ता रोको आंदोलन
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटना (रघुनाथदादा पाटील प्रणित) यांच्या वतीने जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथे मंगळवारी (ता. १५) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिला.
एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचा मोठा खंड पडला असून, या भागात सुमारे ५० दिवस पाऊस झालेला नाही. परिणामी, सोयाबीनमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया प्रभावित झाली असून कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. तूर, कापूस आणि सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे परिस्थितीचे तातडीने पंचनामे करून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच महावितरणकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होत असलेल्या कथित वसुलीला विरोध करण्यात आला. रंभापूर-वारखेड सिमेंट रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून, संबंधित गावांमध्ये रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी करण्यात आली. वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान तसेच शेतकऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
दहा दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास गावागावांत सभा घेऊन जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कौठकर यांनी दिला.
आंदोलनावेळी शेतकरी संघटनेचे दिनेश देऊळकार, निलेश नेमाडे, अमोल मसुरकार, रामकिशोर थुटे, नरेंद्र मानकर, रितेश देशमुख, लक्ष्मण सोलकर, बाळू देशमुख, मकसूद मुल्लाजी, जाफर खा, धनंजय देऊळकार, पंकज इंगळे, दिनेश गिर्हे, अफजल भास्कर, राजू मोरे, अनिल कळसकर, सोपान इंगळे, अनिल कौठकर, शेख नुसरत, विठ्ठल मानकर, दीपक बोबटकार, संजय ढोकणे, डॉ. गोपाल रेखाते यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोओळ :
अकोला : अडगाव बुद्रुक येथे कोरड्या दुष्काळाच्या मागणीसाठी आंदोलन करताना लक्ष्मीकांत कौठकर व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.