

पाणी आहे, पण वीज नाही
शेतकरी हतबल, शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी
राजू नरवडे
संगमनेर, ता.११ः संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, अचानक वीज ये-जा करणे, या प्रकारांमुळे शेतीपंप व विद्युत मोटारी जळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे विहिरी व बोअरवेलमध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही केवळ विजेअभावी उभ्या पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे.
एकीकडे पावसाने दडी मारली असून, दुसरीकडे कडक उन्हामुळे पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत मिळणे आवश्यक असताना वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. गावोगावच्या शेतकऱ्यांना या वीज लपंडावाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतात विद्युत मोटार सुरू केल्यानंतर काही वेळातच वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी वाफ्यापर्यंत पोहोचत नाही.
त्यातच सायंकाळच्या वेळीही वीजपुरवठा नसल्याने डोंगरदऱ्या आणि वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. बिबट्यासह हिंस्र प्राण्यांची भीती असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. वीजपुरवठ्याच्या या समस्येमुळे शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस संताप वाढत असून, विविध गावांतील शेतकरी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून, तसेच मोर्चे काढून आपली व्यथा मांडत आहेत.
...............
साकूर पठार भागात आधीच पावसाने ओढ दिली आहे. त्यात दररोज वीज खंडित होत असून, दोन तासदेखील वीज टिकत नाही. पाणी उपलब्ध असूनही पिकांना देता येत नसल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. येत्या सात ते आठ दिवसांत वीजपुरवठ्यात सुधारणा झाली नाही, तर शेतकऱ्यांचा मोर्चा वीज वितरण कार्यालयावर नेण्यात येईल.
— शंकर खेमनर, सभापती, संगमनेर बाजार समिती
.................................................................
सातत्याने वीज खंडित होत असल्याने शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत. पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. त्यातच पाऊस नसल्याने पिके वाळून चालली आहेत. त्यामुळे तालुक्यात दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत वीजपुरवठा नसतो. वाड्या-वस्त्यांवर आणि डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या शेतकऱ्यांना हिंस्र प्राण्यांच्या भीतीमुळे जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे.
— रमेश आहेर, शेतकरी
................................................................
शेतकरी वारंवार आश्वासनांवर अवलंबून राहणार नाही. आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. बिबट्याच्या भीतीत रात्री शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणखी किती दिवस आणणार, समस्या सोडवली नाही तर तळेगाव सबस्टेशनसमोर तीव्र रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.
— शरद गोर्डे, सामाजिक कार्यकर्ते
................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.