

शेतकरी फसवणूक प्रकरणाशी
नामपूर बाजार समितीचा संबंध नाही
बाजार समिती प्रशासनाचा दावा; शिवार खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरण
नामपूर, जि. नाशिक ः ताहाराबाद (ता. बागलाण) येथील मुक्ताई ट्रेडिंग कंपनीने शेतीमाल खरेदीनंतर शेतकऱ्यांचे पेमेंट थकविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाशी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा संबंध नसल्याचा दावा बाजार समिती प्रशासनाने केला आहे. कंपनीने बाजार समितीच्या आवारात लिलावाद्वारे शेतीमालाची खरेदी न करता शेतकऱ्यांकडून परस्पर शिवार खरेदी केली. त्यामुळे या व्यवहारांतील आर्थिक फसवणुकीस बाजार समिती जबाबदार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
बाजार समिती प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मुक्ताई ट्रेडिंग कंपनीने बाजार समितीच्या मुख्य आवारात किंवा करंजाड उपबाजारात लिलावाद्वारे खरेदी केलेल्या शेतीमालाचे पेमेंट ३० जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना दिले होते. त्यानंतर १ फेब्रुवारीपासून कंपनीने बाजार समितीचा परवाना जमा केला. त्यामुळे या तारखेपासून कंपनीने बाजार समितीच्या लिलाव आवारात शेतीमालाची खरेदी केलेली नाही. त्यानंतर कंपनीने शिवार खरेदीच्या माध्यमातून व्यवहार केले असून, त्यात शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
संबंधित व्यवहारांबाबत शेतकऱ्यांकडे बाजार समितीची अधिकृत काटापट्टी, सौदापट्टी किंवा हिशेबपट्टी उपलब्ध नाही. तसेच, शिवार खरेदीत फसवणूक झाल्याबाबत बाजार समितीच्या कार्यालयात कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नव्हती. कंपनीची खरेदी बंद होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही तक्रार दाखल झाली नसल्याचे प्रशासनाने नमूद केले.
नामपूर मुख्य बाजार आवार आणि करंजाड उपबाजारात शेतीमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पेमेंट दिले जाते. दैनंदिन बाजारभाव व्हॉट्सॲपद्वारे प्रसिद्ध करण्यासह लिलाव सुरू असताना ध्वनिक्षेपकावरूनही रोख पेमेंट घेण्याचे आवाहन केले जाते. व्यवहाराबाबत काही तक्रार असल्यास २४ तासांच्या आत बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले जाते, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात नामपूर व करंजाड येथे शेतीमाल लिलावासाठी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच, जायखेडा येथे तात्पुरते मका खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शिवार खरेदीच्या आमिषाला बळी न पडता बाजार समितीच्या लिलाव प्रक्रियेतून शेतीमाल विक्री करावी, असे आवाहन सभापती मनीषा पगार यांनी केले.
चौकट
शिवार खरेदीसाठी परवाना बंधनकारक
१ फेब्रुवारीपासून मुक्ताई ट्रेडिंग कंपनीचा परवाना जमा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त नसल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेवरील बोजा कमी करण्यात आला. बाजार नियमनमुक्तीनंतर शिवार खरेदीतून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ३० सप्टेंबरपासून शिवार खरेदीसाठी परवाना बंधनकारक करण्याचा निर्णय पणन मंडळाने घेतला आहे.
—संतोष गायकवाड, सचिव, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
शेतकऱ्यांनी शिवार खरेदीपासून सावध राहावे
“बाजार समितीच्या नामपूर मुख्य आवारात, करंजाड उपबाजारात आणि जायखेडा येथील तात्पुरत्या मका खरेदी-विक्री केंद्रात शेतीमाल विक्रीसाठी सुविधा उपलब्ध आहेत. शेतीमाल विक्रीनंतर रोख स्वरूपात पेमेंट मिळत असताना शेतकऱ्यांनी शिवार खरेदीच्या आमिषाला बळी पडू नये. शिवार खरेदीत आर्थिक फसवणूक झाल्यास बाजार समिती प्रशासन जबाबदार राहणार नाही.”
—मनिषा पगार, सभापती, नामपूर बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.