पुणे : शेतकऱ्यांनी परतवला बिबट्याचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

बारामती तालुक्‍यातील काटेवाडी- कन्हेरीजवळील ओढ्यालगत चरणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून मेंढीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महादेव काळे व आनंदा केसकर यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याचा पाठलाग करून हुसकावून लावले.

वालचंदनगर - बारामती तालुक्‍यातील काटेवाडी- कन्हेरीजवळील ओढ्यालगत चरणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून मेंढीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महादेव काळे व आनंदा केसकर यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याचा पाठलाग करून हुसकावून लावले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कन्हेरीमध्ये दोन दिवसांपूर्वी बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला होता. आज (ता. २०) पाच वाजण्याच्या सुमारास महादेव मारुती काळे व आनंदा धुळा केसकर हे चारीलगत १०० मेंढ्या चारण्यासाठी गेले होते, त्या वेळी बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून मेंढीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काळे व केसकर यांनी दगडाने मारत बिबट्याचा पाठलाग केला व हुसकावून लावले. उसाच्या शेतामध्ये बिबट्या पळून गेला. हल्ल्यामध्ये मेंढी जखमी झाली आहे. 

#RingRoad रिंगरोडच्या रुंदीला कात्री

दरम्यान, बिबट्याने हल्ला केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाचे अधिकारी रात्री गस्त घालत आहेत. शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी तातडीने शेतकऱ्यांची भेट घेऊन धीर दिला. या संदर्भात वनपरिमंडल अधिकारी त्र्यंबक जराड यांनी सांगितले, की बिबट्याचा काटेवाडी- कन्हेरी परिसरामध्ये वावर असून, ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. 

वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी कन्हेरीचे सरपंच सतीश काटे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmers have returned the leopard attack