इंदापूरचे शेतकरी पाण्यासाठी आक्रमक 

सचिन लोंढे
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी आक्रमक झाले असून, आठवडाभरात कालव्याला आवर्तन न दिल्यास मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.

कळस (पुणे) : खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी आक्रमक झाले असून, आठवडाभरात कालव्याला आवर्तन न दिल्यास मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. पाण्याचे राजकारण करून तालुक्‍यात पाणीटंचाई निर्माण केली आहे, असा आरोप भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश खारतोडे यांनी केला आहे. 

खारतोडे म्हणाले, ""खडकवासला कालव्याची क्षमता दोन हजार क्‍युसेक असताना प्रत्यक्षात मात्र अकराशे क्‍युसेकने दौंड तालुक्‍यातील शेती सिंचनाला व जानाई शिरसाई योजनेला पाणी दिले जात आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने इंदापूर तालुक्‍यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. कालव्याच्या जिवावर असणारे 22 हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक पडले आहे. खरीप हंगाम वाया गेला असून, शेतीतील कामे ठप्प झाली आहेत. नवीन ऊस लागवड खोळंबली आहे. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मजूर बेरोजगार झाले आहेत. ग्रामीण अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. ही बाब गंभीर असून, तालुक्‍यातील लोकप्रतिनिधी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाण्याचे राजकारण करत आहेत. यामध्ये खडकवासला कालचा शेतकरी होरपळला जात आहे. 

जनावरांना चारा नसल्याने जनावरे छावणीवर जगवली जात आहेत. शेतीला तर पाणी नाहीच, परंतु प्यायलाही पाणी उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीने टॅंकर बंद केले आहेत. खडकवासला कालव्याचे पाणी देण्याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. कळस गावात ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत बहिष्कार घालण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे विजय गावडे यांनी दिली. 
 

खडकवासला कालव्यालगतच्या इंदापूर तालुक्‍यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. कालव्याला पाणी येईल, या आशेवर पाणी टॅंकर बंद करण्यात आले, परंतु अद्यापही कालव्याला पाणी न दिल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. आठवडाभरात पाणी न दिल्यास सिंचन भवनवर मोठे आंदोलन केले जाईल.

- रमेश खारतोडे, 
जिल्हा कार्याध्यक्ष, भाजप किसान मोर्चा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Indapur taluka are aggressive in getting water