

शेतकऱ्यांच्या वारस नोंदी
घेण्याचे बँकांना आदेश
वारसांना कर्जमुक्तीची रक्कम मिळण्यातील संभ्रम दूर
अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : कर्जमुक्ती योजनेच्या याद्यांमध्ये मृत शेतकऱ्यांची नावे आली असून, त्यांच्या वारसांना योजनेचा लाभ मिळण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर सहकार आयुक्तालयाने दूर केला आहे. अशा प्रकरणांमध्ये वारस नोंद घेण्याच्या सूचना राज्यातील सर्व बॅंकांना देण्यात आल्या आहेत.
सहकार आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले आहे. यात मृत शेतकऱ्यांच्या कर्जखात्याबाबत मानक कार्यप्रणाली नमूद करण्यात आली आहे. कर्जमुक्तीचा लाभ केवळ आधार प्रमाणीकरणानंतरच मिळणार आहे. मात्र, मृत शेतकऱ्यांबाबत हा निकष अयोग्य ठरत होता. त्यामुळे वारसांच्या नोंदी घेण्याची आवश्यकता होती. सहकार आयुक्तालयाच्या सूचनेनुसार, बॅंकांनी आता वारसांच्या नोंदी घेऊन या नोंदी तातडीने कर्जमुक्ती योजनेच्या प्रणालीत अपलोड करायच्या आहेत. यात वारसांचे हिस्सेदेखील नमूद करायचे आहेत. ही माहिती संकेतस्थळावरील ‘अपलोड डिसिज्ड् अकाऊंट’ या श्रेणीत अपलोड करण्यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या शासकीय लेखापरीक्षकाकडून संबंधित कर्ज खात्याची तपासणी करावी, असेही आयुक्तालयाने सूचित केले आहे.
बॅंकांनी अपलोड केलेली माहिती महाआयटीकडून पडताळली जाईल. त्यात पात्र असलेल्या कर्जखात्यांची सुधारित यादी विशिष्ट क्रमांकासह नव्याने आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या वारसाला लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करावे लागेल तसेच त्याच्याकडे अॅग्रीस्टॅकमधील शेतकरी ओळख क्रमांकदेखील असावा, असे बंधन शासनाने घातले आहे.
दरम्यान, आधार प्रमाणीकरणात अडथळे येत असल्यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाबाबत एक महत्त्वाचा आदेश सहकार आयुक्तालयाने जारी केला आहे. वयोवृद्ध किंवा बोटांच्या ठशाची नोंद होत नसलेल्या शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्रावर जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
आधार प्रमाणीकरण होत नसल्यास..
आपले सरकार सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण करावे. ते होत नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. त्यानंतरही अडचण असल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’, असा पर्याय केंद्रचालक वापरेल व स्वतःच्या बोटांचे ठसे देईल. यामुळे प्रमाणीकरण पूर्ण होईल. परंतु, पुढे हे प्रकरण तहसीलदारांकडे तपासणीसाठी जाईल. तहसीलदाराने प्रस्ताव पात्र ठरवताच कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्याला दिली जाईल, अशी माहिती सहकार विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.
कोट
मृत कर्जदाराच्या खात्यात एकापेक्षा अधिक वारस असल्यास वारसांच्या हिश्शाच्या प्रमाणात कर्जमुक्तीची रक्कम वारसांच्या कर्जखात्यात जमा होईल. मात्र, अपात्र ठरलेल्या वारसाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
- दीपक तावरे, सहकार आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.