बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; थोरांदळे येथील घटना

नवनाथ भेके
Friday, 30 October 2020

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी मनोहर शंकर फुटाणे जखमी झाले. ही घटना शुक्रवार दुपारी घडली.

निरगुडसर : दुपारी दोन वाजण्याची वेळ होती, मी बटाटा पिकाला पाणी देत होतो, मेंढीचा आवाज आल्याने पुढे गेलो तर मेंढी बिबटयाच्या तोंडात होती. त्यावेळी मी आरडाओरडा केला, त्यामुळे बिबट्याने मेंढीला सोडून दिले पण माझ्याकडे मोर्चा वळवत माझ्यावर हल्ला करत मला जखमी केले. त्यावेळी मेंढपाळ महिलांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे बिबटया पसार झाला. मेंढीचे प्राण वाचले खरे पण मी जखमी झालो, सांगत होते शेतकरी मनोहर शंकर फुटाणे. ही घटना शुक्रवार दुपारी घडली.

थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे खडकी-नागापुर रस्त्यावर नजीक मनोहर फुटाणे यांची शेती आहे. याच्या शेतावर धोंडीभाऊ करगळ हे आपले मेंढी चराईसाठी शुक्रवारी दुपारी घेऊन आले होते. त्यावेळी दुपारी दोनच्या सुमारास अचानक बिबटयाने चरत असलेल्या मेंढीवर हल्ला करुन तिला पकडले. त्यावेळी मेंढीचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर मनोहर फुटाणे त्या दिशेने धावले असता, बिबटयाच्या तोंडात मेंढी होती आणि अंतर खुप जवळ होते.

त्यावेळी मेंढीला वाचवण्याच्या प्रयत्नात आरडाओरडा केला खरा परंतु बिबटयाने मेंढी सोडून शेतक-यावर हल्ला केला. यातून मेंढपाळ व स्थानिक नागरीक धावून आल्यानंतर बिबटया तेथून पसार झाला. जखमी शेतक-याला तातडीने उपचारासाठी घो़डेगाव येथे शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. त्यानंतर घरी सोडण्यात आले.

मेंढी वाचवली, पण... फुटाणे यांच्या शेतात बिबटयाने मेंढीवर हल्ला केला. त्यावेळी मेंढीचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने फुटाणे यांनी बिबट्याच्या दिशेने जाऊन आरडाओरडा केला. त्यावेळी मेंढीला सोडून बिबटयाने फुटाने यांच्यावरच हल्ला केला. यावेळी जवळच असणा-या मेंढपाळ महिलांनी धाऊन जाऊन आरडाओरडा केल्याने बिबटया तेथून पसार झाला. त्यामुळे 'देव तारी, त्याला कोण मारी' याच प्रचिती फुटाणे यांना आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers injured in leopard attack

Tags
टॉपिकस
Topic Tags: