विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे चक्का जाम

विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे चक्का जाम
Published on: 

विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे चक्का जाम

अडगाव बु. येथे आंदोलन; संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या (रघुनाथदादा पाटीलप्रणीत) वतीने सोमवारी (ता. ५) अडगाव बुद्रुक येथील बस स्थानकावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ‘महावितरण’चे स्मार्ट मीटर रद्द करणे, रंभापूर-वारखेड सिमेंट रस्त्याची ठरल्याप्रमाणे रुंदी करणे, बसस्थानक परिसरात दुभाजक, पथदिवे व पादचारी मार्गाची सुविधा करणे, दुष्काळाच्या जाचक अटी रद्द करणे, शेतकरीविरोधी कायदे मागे घेणे तसेच वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासन तसेच संबंधित विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी आंदोलनकर्त्यांशी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. वन अधिकारी सुधीर आंबेकर यांनी वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास पंचनामा करून हेक्टरी २० हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी माहिती दिली.
मंडळ अधिकारी सुधाकर सोनोने आणि ग्राम महसूल अधिकारी प्रवीण देशमुख यांनी पिकांचे सरसकट सर्वेक्षण करण्यात आल्याचे सांगितले. सध्या फळबागांचे सर्वेक्षण सुरू असून, मदतीसाठी त्याचा अहवाल लवकरच शासनाकडे पाठविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महावितरणचे अभियंता मराठे यांनी कलम १५५ व १६३ अंतर्गत मीटर निवडीचा अधिकार ग्राहकांना असल्याचे सांगितले. स्मार्ट मीटरबाबत अर्ज प्राप्त झाल्यास तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
रंभापूर ते वारखेड सिमेंट रस्त्याची रुंदी, दुभाजक आणि पथदिव्यांच्या प्रश्नावर संबंधित कंपनीसोबत समन्वय साधून तीन ते चार दिवसांत अडगाव येथे बैठक घेण्यात येईल, असे ठाणेदार सचिन पाटील, एपीआय देवानंद कायंदे, पोलिस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले आणि पोलिस पाटील हितेश हागे यांनी सांगितले.
आंदोलनात महिला कार्यकर्त्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान संबंधित विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याने विविध प्रश्नांवर चर्चा झाली. मागण्यांबाबत प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

चौकट ----
कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याचा आरोप
शेतकरी कर्जमाफी झाली असली तरी त्याचा शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा आरोप लक्ष्मीकांत कौठकर यांनी केला. बँक कर्मचारी कामचुकारपणा करीत असून, चुकीच्या अटी लावून शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याविरोधात जनजागृती करून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

फोटो ओळी ----
आडगाव बुद्रुक, ता. तेल्हारा ः येथे चक्काजाम आंदोलन करताना लक्ष्मीकांत कौठकर व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.

Marathi News Esakal
www.esakal.com