

समृद्धी महामार्गाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध
साडेदहा कोटींचे व्याज अदा केल्याशिवाय काम सुरू करू न देण्याचा इशारा; शेतकऱ्यांचा इशारा
ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड ः जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनींची बाजारभावानुसार भरपाई आणि त्यावर १२ टक्के व्याज देण्याच्या मागणीवरून नांदेड तालुक्यातील बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासनाने सुमारे १० कोटी ५० लाख रुपयांची व्याजाची रक्कम अदा केल्याशिवाय समृद्धी महामार्गाचे काम सुरू करू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
समृद्धी महामार्गासाठी नांदेड तालुक्यातील काकांडी, तुप्पा, बाभूळगाव, गुंडेगाव, पांगरी, विष्णुपुरी, पिंपळगाव (कोरका), नाळेश्वर, कल्लाळ, जैतापूर, रहाटी आणि बोरगाव (तेलंग) आदी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. भूसंपादन करताना जमिनींचा बाजारभावानुसार मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप अपेक्षित मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, महामार्गाच्या कामासाठी पुन्हा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रिंगरोड, सर्व्हिस रोड आणि इंटरचेंजसाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला आणि व्याजाचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय नव्या भूसंपादनास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
यापूर्वी संपादित केलेल्या जमिनींसाठी सुमारे १० कोटी ५० लाख रुपये व्याजाची रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना देणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. या रकमेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून सुमारे आठ महिने झाले आहेत. मात्र अद्याप प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून, शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बारा गावांतील शेतकऱ्यांची आज बैठक
या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या १२ गावांतील शेतकऱ्यांची रविवारी (ता. ३०) बाभूळगाव फाटा येथे बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी कृती समितीचे प्रमुख दासराव हंबर्डे, अशोक मोरे, शिवाजी कदम, परदेशी बाबूजी, माजिद शेख, दीपक पाटील, माजीद शेठ, हरिश हंबर्डे, संतोष मरके, प्रफुल्ल डोईफोडे, तुळशीराम झरीकर, परसराम झरीकर आदींनी केले आहे.
चौकट ----
खासदार अशोकराव चव्हाण यांनी लक्ष द्यावे ः हंबर्डे
जालना ते नांदेड हा समृद्धी महामार्ग माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यामुळे होत आहे. या महामार्गाला बाधित शेतकऱ्यांचा विरोध नाही. परंतु मावेजाच्या प्रश्नांकडे चव्हाण यांनी लक्ष द्यावे.
- दासराव हंबर्डे, प्रमुख, शेतकरी कृती समिती, नांदेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.