

पोलिसांच्या नोटिसांना घाबरणार नाही;
समृद्धी महामार्ग रोखणारच
आमदार नितीन देशमुख ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शुक्रवारी (ता. ३०) समृद्धी महामार्ग रोखण्यात येणार आहे. हे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी शिवसैनिकांना मोठ्या संख्येने नोटिसा बजावल्या आहेत. ‘आम्ही पोलिसांच्या नोटिसांना घाबरणार नसून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नियोजित आंदोलन होणारच,’ असा निर्धार शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केला.
अकोला येथे गुरुवारी (ता. २९) पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
आमदार देशमुख म्हणाले, की समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. मात्र या महामार्गावरून शेतकऱ्यांना जाता येत नाही, तसेच त्यांचे ट्रॅक्टरही जाऊ दिले जात नाहीत. त्यामुळे महामार्ग रोखण्याच्या आंदोलनाचा सर्वसामान्यांना त्रास होणार नाही. अशा परिस्थितीत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना नोटिसा बजावणे चुकीचे आहे.
आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून शेतकऱ्यांना केले जात आहे. मात्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडावी. शेतकऱ्यांना आंदोलनापासून परावृत्त करू नये, असेही देशमुख म्हणाले.
राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पदरात केवळ पाच हजार रुपये मदत टाकणार असल्याचे सांगितले आहे. या रकमेतून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
‘‘पोलिसांनी कितीही दबाव आणला, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून शिवसैनिक मागे हटणार नाहीत. शुक्रवारी वाशीम जिल्ह्यातील शेलूबाजार येथील समृद्धी महामार्गावरील आंतरबदलस्थळी महामार्ग रोखण्यात येईल,’’ असा पुनरुच्चार त्यांनी केला. या वेळी शिवसेनेचे नेते गोपाल दातकर, मुकेश मुरुमकार, आशीष गावंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.