

उपसाबंदी मागे न घेतल्यास
जलसंपदा कार्यालयासमोर आंदोलन उभारू
राजू शेट्टी ः धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी?
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली / कोल्हापूर ः धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा असताना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात उपसाबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला तीव्र विरोध करत वीजकपात आणि उपसाबंदी तातडीने मागे न घेतल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील महावितरण व जलसंपदा विभागाच्या कार्यालयांसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. तसेच साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांची वीज आणि पाणी रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
उपसाबंदीबाबत शेट्टी यांनी सोशल मीडियावर टीका केली. ते म्हणाले की, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणे सध्या पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. परतीचा पाऊसही पुढील काळात सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असताना तातडीने उपसाबंदी लागू करण्याची गरज काय, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. उपसाबंदी लागू करण्यापूर्वी पुढील वर्षाचे पाणी नियोजन करून ते जनतेसमोर मांडणे आवश्यक असल्याचे सांगत, जलसंपदा विभागाकडे असे नियोजनच नसल्याचा दावा त्यांनी केला. महावितरणकडून शेती पंपांची वीजकपात आणि जलसंपदा विभागाकडून उपसाबंदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना कोंडीत पकडले जात आहे.
राज्यात मुबलक वीज उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री सांगत असताना शेतीपंपांचे दररोज दोन-दोन तास भारनियमन का केले जात आहे, असा प्रश्न शेट्टी यांनी केला. केंद्राने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकरी आणि साखर कारखानदारांसाठी अडचणीचा ठरत असताना राज्य सरकारकडून प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून शेतकऱ्यांवर दबाव आणला जात आहे.
‘नुकसान भरपाईनंतरच
कारखाने सुरू करावेत’
१५ ऑक्टोबर ही उसाच्या परिपक्वतेच्या दृष्टीने लवकरची तारीख आहे. लवकर तोडणी केल्यास उसातील साखरेचा उतारा कमी होण्याबरोबरच वजनातही शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम कारखान्यांच्या आर्थिक गणितावर आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एफआरपीवर होऊ शकतो. १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करायचे असतील, तर शेतकऱ्यांना प्रति टन ५०० रुपये नुकसान भरपाई द्यावी, त्यानंतरच कारखाने सुरू करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.